काही वेळेपूर्वीच महामुंबई मेट्रोकडून एक्स अकाऊंटच्या माध्यमातून प्रवाशांसाठी पोस्ट शेअर करत मेट्रो उशिरा धावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "मेट्रो सेवेच्याबाबतीत अपडेट, मेट्रो मार्गिका 2A आणि 7 मध्ये काही तात्पुरत्या तांत्रिक अडचणीमुळे मेट्रो मार्गिका 2A आणि 7 वरील सेवांमध्ये काही वेळेसाठी विलंब होत आहे. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मेट्रो सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आमची टीम युद्धपातळीवर कार्यरत आहे. कृपया सहकार्य करावे."
advertisement
मुंबई मेट्रो 2A (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो 7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या दोन्हीही मार्गांवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक मेट्रो स्थानकांवर मेट्रो थांबलेल्या आहेत. ऐन संध्याकाळच्या वेळेमध्ये नोकरदारांना घरी जाण्याची एकच गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळेमध्ये मेट्रो बंद झाल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. ऐन पिक अवरच्या काळामध्ये, मेट्रो बंद होण्याचा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा मेट्रो बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरलेली पाहायला मिळाली होती. आता मेट्रो 2A (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो 7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) किती वेळात पुन्हा पुर्व पदावर येतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई मेट्रो 2A (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो 7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) अशा मार्गावर धावत आहे. या दोन्हीही मार्गांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या मार्गावर सर्वाधिक कॉर्पोरेट ऑफिसेस असल्यामुळे मेट्रोचा सर्वाधिक वापर नोकरदार वर्ग जास्त करत असतो. आज रविवार असल्यामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळित झाल्याचा फटका फारसा प्रवाशांना बसला नाही. रविवारच्या दिवशीही अनेक ऑफिसेस असतं. त्यामुळे त्या नोकरदारांना मेट्रो सेवा विस्कळितचा फटका बसण्याची शक्यता आहे.
