मध्य रेल्वेवरील मुंबई मंडळाच्या अखत्यारीत येणार्या मुंबई आणि उपनगरांमधील प्रमुख चार रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म्सचा विस्तार केला जाणार आहे. पुढील पाच वर्षांत चार प्रमुख टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जाणार असल्याने, मुंबईहून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या गाड्यांची संख्याही वाढेल. त्यामुळे अधिक प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत. परळ, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल आणि कल्याण अशा चार प्रमुख रेल्वे स्थानकांवर एकूण 20 नवीन प्लॅटफॉर्म्स बांधले जाणार आहेत. देशातील कोणत्याही कोपऱ्यात या स्थानकांवरून अतिरिक्त मेल आणि एक्सप्रेस चालवले जाणार आहे.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआर क्षेत्रातील चार टर्मिनसची क्षमता वाढविण्यासाठी सध्या विविध विकास कामे सुरू आहेत. परळ येथे पाच, कल्याण येथे सहा, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे चार आणि पनवेल येथे पाच अशा प्लॅटफॉर्मसचे सध्या कामं सुरू आहेत. वाढती लोकसंख्या आणि लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या ट्रेनची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा होईल. रेल्वेने स्टेशन वाढवण्याचा निर्णय प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपक्रम घेतला आहे.
रेल्वे अर्थसंकल्प 2025 मध्ये परळला टर्मिनस म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव होता. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परळ टर्मिनस हे कुर्ला आणि परळ दरम्यानच्या नवीन पाचव्या आणि सहाव्या मार्गाशी जोडले जाईल, ज्याचा वापर फक्त मेल/ एक्सप्रेस गाड्यांसाठी केला जाईल. या नव्या मार्गिकेंमुळे दादर आणि सीएसएमटी स्थानकांवरचा भार आणखी काही प्रमाणात कमी होईल. अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत विद्यमान परळ स्टेशनची पुनर्रचना करण्यात आली आहे. अतिरिक्त प्लॅटफॉर्ममुळे मेल आणि एक्सप्रेस चालवण्यासाठी मदत मिळणार आहे.
परळसह एलटीटीमध्ये चार नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आहे. हे स्थानक प्रामुख्याने उत्तर भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी उभारले जाणार आहे. नवीन प्लॅटफॉर्म सुविधेमुळे शहरांतर्गत आणि एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढवता येणार आहे. त्याचप्रमाणे, वेगाने विकसित होत असलेल्या पनवेल स्थानकावर पाच नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो नेटवर्कसह पनवेल एक प्रमुख वाहतूक इंटरचेंज बनण्यास सज्ज होणार असून, या ठिकाणावरून कोकणसाठी ट्रेनची संख्या वाढविणे शक्य होणार आहे.
