या अभियानामागचे मुख्य कारण म्हणजे कळवा व मुंब्रा परिसरातील प्रवाशांना येणाऱ्या दररोजच्या प्रवासातील अडचणी. सकाळच्या व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत सर्व गाड्या आधीच भरलेल्या येतात. त्यामुळे कळवा स्थानकावर प्रवाशांना ट्रेनमध्ये चढणे अत्यंत कठीण जाते. अनेक प्रवाशांना ठाण्यावरून परत प्रवास करावा लागतो. ज्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. यावर उपाय म्हणून समितीने मागणी सर्व 12 डब्यांच्या लोकल गाड्या 15 डब्यांच्या कराव्यात, गाड्यांची संख्या वाढवावी आणि वाढत्या प्रवासी ताणाचा सामना करण्यासाठी रेल्वे कर्मचारी भरती करावी, अशी मागणी केली आहे.
advertisement
IRCTC : प्रवासापूर्वी लक्ष द्या! आयआरसीटीसीच्या नियमात झाला मोठा बदल, प्रवाशांना लागणार फटका
कळवा कारशेडमधून जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांना रिस्क घेऊन खालून उडी मारून चढावे लागते. त्यामुळे तातडीने कारशेड प्लॅटफॉर्म उभारावा अशी मागणीही समितीने केली आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, या मागण्या गेली 35 वर्षांपासून प्रलंबित आहेत. पण अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही.
स्थानिक रहिवासी सुमन कांबळे ज्या गेल्या 15 वर्षांपासून येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात सांगतात की त्यांची नातवंडे, मुली आणि जावई रोज रिस्क घेऊन ट्रेन पकडतात. “5 ट्रेन गेल्यावरच एक मिळते, त्यामुळे रोज कामावर उशीर होतो,” असे त्यांनी सांगितले.
कळवा स्टेशनवरील मूलभूत सुविधांचा अभावही प्रवाशांनी व्यक्त केला आहे. स्टेशनवर शौचालय नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध नाही आणि स्वच्छतेचा गंभीर अभाव आहे. “रेल्वे प्रशासनाने या समस्या तातडीने सोडवाव्यात,” अशी मागणी प्रवाशांनी केली. रेल्वे सुरक्षा संघर्ष समितीने स्पष्ट केले की हे आंदोलन केवळ आजपुरते मर्यादित नसून प्रवाशांच्या हक्कांसाठी हा संघर्ष पुढेही सुरू राहील.





