मुंबई : मुंबईसह उपनगरातील वाहतुकीची समस्या ही कायमची आहे. या वर उपाय म्हणून पहिल्यांदा वांद्रे-कुर्ला पॉड टॅक्सीची सुरुवात होणार आहे. मात्र, आता त्या पाठोपाठा मुंबईतील काही महत्त्वाच्या शहरातही पॉड टॅक्सीची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.
advertisement
'या' शहरात सुरू होणार पॉड टॅक्सी
बीकेसीप्रमाणे आता ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर परिसरातील प्रवाशांना आधुनिक वाहतुकीचा नवा अनुभव मिळणार आहे. त्याकरती पॉड टॅक्सीची सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेला जबाबदारी देण्यात आली आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, प्रत्येक शहरासाठी अंदाजे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचा आर्थिक भार स्थानिक महापालिकांवर पडणार नाही.
ठाण्यातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांपासून शहरातील अन्य प्रमुख भागांपर्यंत नागरिकांना जाण्यासाठी ही पॉड टॅक्सी सेवा उपयुक्त ठरणार आहे. मुख्य रस्त्यांवरून आणि गर्दीच्या भागांवरून धावणाऱ्या या लहान, स्वयंचलित पॉड टॅक्सींमुळे वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवाशांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईच्या उपनगरांमध्ये स्मार्ट सिटी आणि ग्रीन ट्रान्सपोर्ट संकल्पनेला चालना मिळणार असून हा प्रकल्प शहरातील वाहतुकीसाठी नवा टप्पा ठरेल. नागरिकांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय मिळणार आहे.
