ठाण्याच्या पाचपाखडी परिसरात राहणार्या वृद्धाच्या बँक खात्यातून दहशतवादी संघटनांशी आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगत एका फ्रॉड व्यक्तीने 64 वर्षीय व्यक्तीकडून कोट्यवधी उकळले आहेत. ज्याचा सध्या पोलिस शोध घेत आहेत. अटकेची भिती दाखवून त्याने वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलिस तपास सुरू आहे. 64 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती सेवा निवृत्त असून ते घरबसल्या शेअर ट्रेडिंग करतात. महिन्याभरापूर्वी 64 वर्षीय व्यक्तीच्या मोबाईलवर राजेश चौधरी नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. ज्यामध्ये त्याने 'डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया'मधून बोलत असल्याची बतावणी केली.
advertisement
पुढे त्या सायबर ठगी व्यक्तीने 64 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या आधार कार्डचा वापर करुन सीमकार्ड खरेदी केल्याचे सांगितले. त्या ठगी व्यक्तीने सीमकार्डद्वारे अनेक लोकांना धमकावल्याचे त्यांना सांगितले. या धमकी प्रकरणात नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती चौधरीने वृद्धाला दिली. काही वेळाने नाशिक पोलिस तुमच्यासोबत संपर्क करतील, असं सुद्धा त्याने सांगितले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वृद्धाला पुन्हा बनावट पोलिसांकडून संपर्क साधण्यात आला. समोरच्या व्यक्तीने तो पंचवटी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप राय असल्याचा बनाव केला. आणि त्या वृद्धाला तुमच्या बँक खात्यातून दहशतवादी संघटनेसोबत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले.
ठगी चौधरी इतक्यावरच थांबला नाही. त्याने वृद्धाला संबंधित प्रकरण राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत असून यापुढे एकांतात त्यांच्यासोबत संपर्क साधण्याबद्दलची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी वृद्धाला एक व्हिडीओ कॉल करण्यात आला. त्यांनी व्हिडीओ कॉलला प्रतिसाद दिला असता, समोरील व्यक्तीने तो संदीप राय असल्याची बतावणी केली. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्या वृद्ध व्यक्तीला त्यांची वैयक्तिक माहिती विचारण्यात आली. 28 नोव्हेंबरला त्यांना पुन्हा संपर्क साधण्यात आला. त्यांच्या बँक खात्यातील रक्कम आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात पाठविली. काही दिवसांनी त्यांनी वृत्तपत्रात डिजीटल अटके संदर्भातील वृत्त वाचले. वृत्त वाचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे.
