विरारमध्ये एका स्कूल व्हॅनला आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांची व्हॅन पेटत असल्याचे दिसताच ऑन ड्यूटी असणारे वाहतूक पोलीस देवदूत म्हणून धावले आणि मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत एकाही विद्यार्थ्याला इजा झाली नाही. पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केल जात आहे. काल सकाळी (13 नोव्हेंबर) विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे टाटा मॅजिक वाहन विरार येथील चंदनसार रस्त्याकडून विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून चालले होते. पण, वाहन सुरू असताना अचानक चालत्या वाहनाला आग लागली. या घटनेमुळे पुलावरून चालणारे पादचारी आणि वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
advertisement
यावेळी घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस हवालदार कैलास कोकाटे आणि पोलीस शिपाई सुभाष जाधव यांनी वेळेत धाव घेत तत्परतेने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे मोठा अपघात टळला. पोलीसांच्या कार्यतत्परतेमुळे 7 ते 8 शाळकरी मुलांचा जीव थोडक्यात बचावला. त्यामुळे शाळकरी मुलांचा जीव थोडक्यात बचावला. दरम्यान, गाडीची तपासणी केली असता, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेच्या माध्यमातून स्कुल व्हॅन चालक शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळत तर नाही ना? असा सवाल निर्माण होतो. दरम्यान, पोलिस हवालदार आणि वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि सतर्कतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
विरारमध्ये स्कुल व्हॅनला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दरम्यान अशा वाढत्या घटनेमुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहनांची दुरुस्ती वेळेत करण्याची मागणी पालकांनी केली आहे. घटनेमध्ये पोलिसांनी कार्यतत्परता दाखवल्यामुळे 7 ते 8 शाळकरी मुलांचा जीव वाचला आहे. खबरदारी म्हणून खाजगी वाहनांमधून शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेक व्हॅन ड्रायव्हर वाहतूकी संबंधितचे नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना शाळेत सोडवतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो.
