गतसाली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचे पानिपत केले. शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा, मराठा आरक्षण, दलितांच्या मनातील अस्वस्थता, मुस्लिमांच्या मनातील आघाडीबद्दलचा हळवा कोपरा अशा मुद्द्यांच्या भरोशावर आपण सत्तेत येणार, असे आघाडीला वाटत होते. परंतु भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि संघाच्या संलग्न इतरही संस्थाच्या मदतीने निवडणूकविषयक सूक्ष्म रणनीती आखून निवडणूक कशी जिंकायचे असते याचे प्रात्याक्षिक संपूर्ण देशाला दाखवले. तोच कित्ता भाजपने बिहारमध्येही गिरवला. महाराष्ट्रात दीड रुपये लाडक्या बहिणींना देऊन त्यांची मते मिळविण्यात यशस्वी झालेल्या महायुतीने बिहारमध्येही महिलांच्या खात्यात एकाचवेळी तब्बल १० हजार रुपये जमा केल्याने लाडक्या बहिणींनी भरघोस साथ दिली. निवडणूक निकालानंतर तज्ज्ञांच्या विश्लेषणात 'लाडकी बहीण'सहित जंगलराज विरुद्ध सुशासन या भाजपच्या प्रचाराला लोकांनी पसंती दिली.
advertisement
भाजप मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसू शकतो ते ही नितीश कुमार यांना बाजूला ठेवून!
निवडणूक निकालानंतर भाजप सातव्या आसमानावर आहे. लढवलेल्या १०१ जागांपैकी तब्बल ९३ जागांवर भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. भाजपला मिळालेल्या यशाने जेडीयूचे डोळे दिपले आहेत. जेडीयूला देखील लोकांनी भरभरून मतदान केले असले तरीही भाजपला मिळालेल्या जागांपुढे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कुर्बान करावी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी १२२ आमदारांची गरज आहे. सध्याच्या आकड्यांनुसार, भाजप ९३, लोक जनशक्ती मोर्चाचे २०, हिंदुस्थानी आवाम मोर्चा (हम) ५ आणि आरएलएमच्या ४ जागा मिळून १२२ आमदारांच्या एकत्रिकरणाने भाजपचा व्यक्ती मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसू शकतो ते ही नितीश कुमार यांना बाजूला ठेवून!
भाजप नेते सांगतायेत- एकत्रित बसून निर्णय घेऊ, नितीश कुमार मात्र मौनव्रतात
बिहारमध्ये निर्विवाद यश मिळावल्यानंतर भाजप नेत्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असे सांगत अप्रत्यक्षपणे नेतृत्वबदलावर चर्चा होणार असल्याचेच संकेत त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे बिहारच्या आकड्यांनी नितीश कुमार मात्र मौनव्रतात आहेत. सकाळपासून सायंकाळी पावणे पाचपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. महाराष्ट्रात निवडणूक निकालानंतर जसे नेतृत्वबदलाच्या संकेतांनी एकनाथ शिंदे मौनव्रतात गेले होते तसे नितीश कुमार देखील मौनव्रतात गेल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
