पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी दिल्ली स्फोटातील जखमींची भेट घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला हल्ल्यातील मृत नागरिकांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचं मौन पाळण्यात आलं. कॅबिनेटने पारित केलेल्या ठरावात हा भीषण दहशतवादी हल्ला असल्याचं पहिल्यांदाच म्हणण्यात आलं.
advertisement
हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली असून घटनास्थळी तत्परतेने मदत करणाऱ्या डॉक्टर, बचाव पथक आणि सुरक्षा यंत्रणांचं कौतुक करण्यात आलं आहे.
कॅबिनेटने भारताची दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे आणि या घटनेमागील आरोपी, त्यांचे साथीदार आणि मास्टरमाईंडला पकडण्याचे निर्देश दिले आहे. सरकारकडून परिस्थितीवर उच्चस्तरीय पातळीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचंही कॅबिनेटने स्पष्ट केलं.
पाकिस्तानचा उल्लेख टाळला
दरम्यान, लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात गृहमंत्री अमित शाह यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीत संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे मांडला,अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. 'सध्या तपास सुरू असल्याने कोणत्याही देशाचं नाव घेतलेलं नाही आणि या चौकशीतल्या सर्व बाबी तपास संस्थांकडे दिल्या आहेत' असं शाहांनी स्पष्ट केलं.
सुरक्षा दलांच्या तात्काळ समन्वयामुळे एक मोठा दहशतवादी हल्ला टळला. कॅबिनेटने या यशस्वी कारवाईबद्दल सुरक्षा यंत्रणांचं विशेष कौतुक केलं. गृहमंत्रालय आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा अलीकडील विमानतळातील तांत्रिक अडचणींशी काहीही संबंध नाही. तसंच, हा स्फोट अधिक मोठा आणि गंभीर ठरू शकला असता, परंतु सतर्क सुरक्षा दलांनी त्याला वेळेत हाणून पाडलं.
