नमाजला जाताना झाला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी जमीर खान हे सकाळी ५ वाजता नमाज पठणासाठी जामा मशिदीकडे पायी जात होते. याचवेळी पोलीस कॉलनीजवळ त्यांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याने जमीर खान यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन त्यांना रक्तबंबाळ केले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेऊन रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनचा पहिला डोस देण्यात आला. घटनेपर्यंत जमीर खान यांना रेबीजचे तीन इंजेक्शन देण्यात आले होते, तर चौथा इंजेक्शन २० डिसेंबरला देणे अपेक्षित होते.
advertisement
डॉक्टरही हैराण, नागपूरमध्ये अखेरचा श्वास
जमीर खान यांना तीन इंजेक्शन लागूनही त्यांची प्रकृती बिघडायला लागली. २ डिसेंबरपासून त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने त्यांना तातडीने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेबीजचे इंजेक्शन देऊनही रुग्णाची तब्येत का बिघडली? या प्रश्नाने डॉक्टरही गोंधळात पडले. अखेर प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. तिथे शनिवारी रात्री त्यांना दाखल करण्यात आले, दुर्दैवाने त्याच रात्री त्यांचा निधन झाले.
इंजेक्शनच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
जमीर खान यांना रेबीजचे तीन डोस मिळाले असतानाही त्यांचा मृत्यू झाल्याने, जिल्हा रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची गुणवत्ता प्रभावी आहे की नाही, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याबद्दल जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉ. निलय जैन यांनी सांगितले की, "मृताच्या डायग्नोसिस रिपोर्टमध्ये नेमके मृत्यूचे कारण काय दिले आहे, हे नागपूरच्या डॉक्टरांकडून जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तीन इंजेक्शननंतर संसर्गाचा धोका कमी होतो. अनेक रुग्णांना या इंजेक्शनमुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जमीर खान यांचा मृत्यू खरोखरच रेबीजच्या संसर्गाने झाला की अन्य कारणांमुळे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे."
