पाटणा: जसे-जसे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढताना दिसत आहे. संपूर्ण बिहारमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असून या वातावरणाचा परिणाम आता देशातील प्रसिद्ध सट्टा बाजारांवरही दिसू लागला आहे. विशेषतः राजस्थानमधील प्रसिध्द फलोदी सट्टा बाजारात बिहार निवडणुकीसंबंधी भाकिते आणि अंदाज समोर आले आहेत. या अंदाजांनुसार भाजप समर्थित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) या वेळी मजबुतीने आघाडीवर असल्याचे दिसते आहे.
advertisement
या सट्टा बाजाराच्या म्हणण्यानुसार, यंदा बिहारमध्ये पुन्हा एकदा NDA ची सत्ता स्थापन होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार NDA ला 132 ते 134 जागा मिळू शकतात. लक्षात घेण्याची गोष्टी अशी की बिहार विधानसभेच्या बहुमतासाठी किमान 122 जागांची आवश्यकता असते. दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाखालील महाआघाडी (Grand Alliance) या वेळी मागे पडलेले दिसत आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार महाआघाडीच्या खात्यात केवळ 94 ते 97 जागा येण्याची शक्यता आहे.
भाजपच्या बाबतीत बोलायचे झाले, तर NDA अंतर्गत भाजपने एकूण 101 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सट्टा बाजारातील आकड्यानुसार, भाजपला 64 ते 66 जागा मिळू शकतात. तर नीतीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) म्हणजेच जेडीयूने देखील 101 जागांवर उमेदवार उभे केले आहेत आणि त्यांना 51 ते 53 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महाआघाडीच्या बाजूने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (RJD) या निवडणुकीत सर्वाधिक 143 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सट्टा बाजाराच्या मते RJD ला यंदा 69 ते 71 जागा मिळू शकतात. याशिवाय काही स्वतंत्र उमेदवार आणि छोट्या पक्षांनाही काही जागा मिळण्याची शक्यता आहे.
अर्थात हे सर्व अंदाज आणि सट्टेबाजारातील गणिते केवळ अंदाजावर आधारित आहेत. खरी स्थिती आणि निकाल 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या मात्र बिहार निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सट्टा बाजार अक्षरशः तापलेला असून राजकीय वर्तुळात या आकड्यांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
