कार्तिक एकादशी निमित्ताने झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सणाला गालबोट लागलं आहे. 3000 भाविक एकावेळी मंदिरात जाऊ शकतात, इतकीच कपॅसिटी असताना 25000 भाविकांनी गर्दी केली होती.
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वरा मंदिरात आज, शनिवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
advertisement
या दुःखद घटनेत भाविकांचा झालेला मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या तीव्र खेद व्यक्त करतो. तसेच, जखमी झालेल्या लोकांना त्वरित आणि योग्य उपचार पुरवण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मी स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदतकार्यावर देखरेख ठेवण्याची विनंती केली आहे.” घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
सकाळच्या वेळी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. याच गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाल्याने अनेक भाविक खाली कोसळले, ज्यामुळे गंभीर दुर्घटना घडली. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे वृत्त आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
