माझ्या पसंतीचे सिडकोचे घर (ऑक्टोबर 2024) या योजनेअंतर्गत काढलेल्या लॉटरीमध्ये अनेक नोडमधील घरांच्या जास्त किमतींमुळे नागरिक नाराज होते. सिडको प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सोडतधारकांनी अनेक वेळा आंदोलने, मोर्चे आणि निवेदने दिली. तरीदेखील शासनाने ठोस भूमिका घेतली नव्हती त्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत होता.
10 जुलै 2025 रोजी विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको घरांच्या दरांबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी सिडकोच्या गृहधोरणावर आणि वाढीव दरांवर शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळीही निर्णय झाला नव्हता.
advertisement
मात्र काही दिवसांपूर्वी वाशी येथे झालेल्या स्व. आण्णासाहेब पाटील जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर लवकर बैठक घेण्याचे संकेत दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही “सिडको घरांच्या किमतींबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल,” असे आश्वासन दिले. त्यांनी पोलिस गृहनिर्माण योजनेतील घरांची किंमत 50 लाखांवरून 15 लाखांपर्यंत कमी केल्याचं उदाहरण देत नागरिकांना दिलासा दिला होता.
दरम्यान, आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या घरांच्या मूळ किंमती सध्याच्या दरांपेक्षा 30 ते 50 टक्क्यांनी कमी असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे घरांच्या किंमतींमध्ये मोठी कपात होण्याची शक्यता वाढली आहे.
ही बैठक दिवाळीनंतर सोडतधारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही बैठक निश्चित झाल्याने नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. जर या बैठकीत दरकपातीचा निर्णय झाला तर राज्यभरातील लाखो सोडतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सरकारने सिडकोच्या घरांच्या दरांमध्ये कपात जाहीर केल्यास नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि अनेकांची घर मिळवण्याची वर्षानुवर्षांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.
