मेहराज शेख हा नालासोपारा पश्चिमेतील टाकीपाडा परिसरातील एका चाळीत आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होता. 3 डिसेंबर रोजी खेळायला गेला मात्र दुपारी एक वाजले तरी तो घरात परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. परिसरात शिवाय आजूबाजूच्या इमारतीत, आसपासच्या जागी सगळीकडे शोधूनही मेहराजचा काहीच पत्ता न लागल्याने अखेर 4 डिसेंबर रोजी त्याच्या आईने नालासोपारा पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला होता.
advertisement
हरवलेला मुलगा अखेर सापडला पण...
तपास सुरू असतानाच सोमवारी सकाळी एका इमारतीतील पाण्याच्या टाकीत काहीतरी संशयास्पद आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत टाकीतील मृतदेह बाहेर काढला असता तो मेहराजचा असल्याची खात्री झाली. मृतदेह बराच वेळ पाण्यात असल्याने ओळख पटविण्यास काहीशी अडचण येत होती; मात्र कुटुंबीयांनी खात्री केल्यानंतर पुढील तपासाला गती देण्यात आली.
चौकशीदरम्यान मेहराजसोबत खेळणाऱ्या त्याच्या काही मित्रांनी महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली. मुलं लपाछपी खेळत असताना मेहराज चुकून इमारतीच्या परिसरात गेला आणि पाण्याच्या टाकीजवळ लपण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल जाऊन तो आत पडल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या मुलांनी भीतीपोटी तत्काळ ही माहिती कोणालाही न सांगितल्याचेही समोर आले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे दिसत असले तरी सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
