गणेश सांगडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, आठ महिन्यांपूर्वी सह्याद्री मोटर्समधून खरेदी केलेल्या थार रॉक्स मॉडेलमध्ये सुरुवातीपासूनच अनेक गंभीर तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. कारच्या बॉडीला अकाली गंज येणे, रंग उडणे, सतत पाणी गळती होणे, इंजिन ऑइलमध्ये डिझेल मिसळणे आणि वाहन वारंवार रिजनरेशन मागणे अशा मोठ्या प्रमाणातील दोषांमुळे सांगडे गेल्या काही महिन्यांपासून हैराण झाले होते. एवढेच नव्हे तर कारची बॅटरीही वेळोवेळी खराब होत होती, तसेच इंजिनमध्ये देखील वारंवार फॉल्ट दिसत होता. त्यामुळे सांगडे यांनी जवळपास 25 वेळा शोरूममध्ये धाव घेतली, मात्र तरीही वाहनातील समस्या सुटत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रात आता लाट नव्हे त्सुनामी येणार, या जिल्ह्यांना कोल्ड वेव्हचा यलो अलर्ट
गणेश सांगडे यांनी सांगितले, 22 लाखांची नवी गाडी घेऊन सतत तिची दुरुस्ती करावी लागणे हे कोणाच्याही नशिबात नसायला हवं. पावसाळ्यात कारच्या आत पाणी गळतं, गंज चढतोय, इंजिन फॉल्ट दाखवतंय, आणि शोरूमकडून फक्त तसदी. एवढ्या वेळा ये-जा करूनही समाधानकारक दुरुस्ती न मिळाल्याने शेवटी मला हा अनोखा निषेध करावा लागला. उद्या या गाडीमुळे काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असे सांगत त्यांनी कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांच्या या निषेधाचे कारण म्हणजे ग्राहकाने पैसे मोजून नवीन गाडी घेतल्यानंतर वारंवार तांत्रिक बिघाड सहन करण्याची वेळ येऊ नये. त्यांनी साफ शब्दांत म्हटले की आता ही गाडी स्वीकारण्यायोग्य नाही, त्यामुळे कंपनीने वाहन बदलून द्यावे अन्यथा पैसे द्यावे.
या संपूर्ण प्रकरणावर सह्याद्री मोटर्सच्या बिझनेस हेड अतिन पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कंपनीच्या नियम आणि अटींचे पालन करत आम्ही ग्राहकाला आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या देऊ. SOP नुसार जे काही पार्ट्स खराब असतील ते बदलून देण्याची पूर्ण तयारी आहे. ग्राहकांचा मुद्दा वाजवी आहे आणि आम्ही त्यावर काम करू.
सांगडे यांनी केलेल्या या अनोख्या निषेधामुळे वाहन गुणवत्तेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत. ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी कंपनीची सेवा, दुरुस्ती आणि वॉरंटी हाताळणी किती महत्त्वाची असते हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. महागडे वाहन घेतल्यानंतर ग्राहकांना त्रास सहन करावा लागल्यास ते किती असहाय होऊ शकतात, याचे हे मोठे उदाहरण ठरले आहे.
या प्रकरणाला आता सोशल मीडियावरून मोठा प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांच्या हक्कांबाबत आणि वाहन कंपन्यांच्या जबाबदारीवर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.





