गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात यंदा देशी सफरचंदांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सफरचंद बागांना मोठा फटका बसला असून स्थानिक उत्पादन घटल्याने बाजारात परदेशी सफरचंदांना मागणी वाढली आहे. परिणामी, अफगाणिस्तानमधील सफरचंदांनी बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नाद करा पण आमचा कुठं! छ. संभाजीनगरच्या 'हिंद केसरी' कॅप्टन बैलाची तब्बल इतक्या लाखांना विक्री
advertisement
सध्या अफगाणी सफरचंदांचा घाऊक दर 10 किलोसाठी 900 ते 1100 रुपये इतका असून किरकोळ बाजारात प्रतिकिलो 130 ते 160 रुपयांपर्यंत दर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या दरात 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे. हिमाचल आणि काश्मीरमधील सफरचंदांचा हंगाम यंदा 15 दिवस आधी संपल्याने अफगाणी सफरचंदांची आवक वेळेआधीच सुरू झाली. दररोज जवळपास 6 हजार पेट्या अफगाणी सफरचंदांची आवक होत असून, यामध्ये लाल, गोल्डन आणि विविध दर्जाच्या सफरचंदांचा समावेश आहे.
फळ व्यापारी सुयोग झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये पिकवली जाणारी सफरचंदे पूर्वी पाकिस्तानमार्गे आटारी बॉर्डर ओलांडून भारतात येत असत. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमधील फळे तिथून बंदरांपर्यंत पोहोचवून समुद्रमार्गे थेट मुंबईत पाठवली जातात.
झेंडे पुढे म्हणाले, समुद्रमार्गामुळे वाहतूक खर्च किंचित वाढला असला तरी सफरचंदांची हाताळणी कमी झाल्याने फळांचा दर्जा अधिक चांगला राहतो. त्यामुळे यावर्षी अफगाणी सफरचंदांची गुणवत्ता उत्तम आहे. फळे अधिक ताजी, चमकदार आणि टिकाऊ असल्याने ग्राहकांचा कल यांच्याकडे वाढला आहे.
सध्या बाजारात अफगाणी सफरचंदांची मोठ्या प्रमाणात मागणी असून, त्याच्यामुळे दरही स्थिर राहण्याची शक्यता आहे. देशी सफरचंदांचा पुरवठा मर्यादित राहिल्याने आगामी काही आठवड्यांपर्यंत अफगाणी सफरचंदांचा दबदबा टिकेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
अफगाणी सफरचंदांचा हा समुद्री प्रवास भारताच्या फळबाजारात एक नवीन अध्याय ठरत आहे. एका बाजूला वाहतुकीचा खर्च वाढला असला तरी दर्जेदार आणि आकर्षक सफरचंदांच्या उपलब्धतेमुळे ग्राहक आणि व्यापारी दोघेही समाधानी आहेत. त्यामुळे येत्या काळातही या सफरचंदांची मागणी टिकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





