गोळीबार आणि कोयत्याने वार करून गणेश काळेची हत्या करण्यात आली. पुण्यातील खडी मशीन चौकात शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास गणेश काळेवर हल्ला करण्यात आला. दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी तब्बल 9 गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या गणेश काळेला लागल्या, तसंच त्याच्यावर कोयत्यानंही वार करण्यात आला. या भीषण हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश काळेच्या हत्येचं गँगवॉरसोबत कनेक्शन आहे.
advertisement
हत्या प्रकरणात पोलिसांनी वाहनं जप्त केली
गणेश काळे हा समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे. समीर काळे याने वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशातून 10 पिस्टल पुरवल्या होत्या. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश काळेची हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जातोय. गणेश काळेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी वाहनं जप्त करत आरोपींना अटक केली.
हालचालींवर कडक पाळत ठेवण्याचे निर्देश
बंडू आंदेकर यांने वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी वर्षभरापासून नियोजित तयारी केली होती.
एका प्रकरणात अटक होईल, हे गृहीत धरून टोळीतील काही जणांवर पुढील जबाबदाऱ्या सोपवल्या आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद पुरवल्याची पोलिसांची माहिती आहे. या सर्व घटनांमुळे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, टोळीतील सदस्यांच्या हालचालींवर कडक पाळत ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
अमन शेख, अरबाज पटेल या आरोपींना अटक करण्यात आली. तर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. एकूण नऊ आरोपींच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ आरोपींपैकी बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर सध्या जेलमध्ये आहेत
