या अपघाताची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडीओज आणि फोटोज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातून हा अपघात किती भीषण होता, हे दिसून येत आहे. दरम्यान, अपघातस्थळी आलेल्या एका रुग्णवाहिका चालकाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हा अपघात पाहून चालकाने थेट देवाकडेच प्रार्थना केली. असा अपघात पुन्हा घडू नये, असं त्यांनी म्हटलं.
advertisement
नवले पुलावर झालेल्या अपघाताची माहिती देताना रुग्णवाहिका चालक सचिन मोरे यांनी सांगितलं की, मी विविध अपघाताच्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची वाहतूक यापूर्वी केली आहे. मात्र, या अपघातात मृतांची अवस्था पाहून अतिव दुःख झाले. अशी घटना पुन्हा होऊ नये, हीच देवाकडे प्रार्थना...
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात एका व्यक्तीचा फोन आला. त्याने नवले पुलाजवळ दोन ते तीन वाहनांचा अपघात झाला असून, त्यांना आग लागली असल्याचे सांगितले. अग्निशमन दलाकडून तत्काळ सिंहगड रोड अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळाकडे सोडण्यात आली. गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक कारमध्ये व्यक्ती अकडल्याचे समजले आणि धावाधाव उडाली. सर्वच यंत्रणा कामाला लागल्या.
अग्निशमन नियंत्रण कक्षातून सिंहगड रोड केंद्राची पहिली गाडी पाठवली होती. ती साधारण ५.४८ वाजता घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर एका मिनिटात नवले आणि 'पीएमआरडीए' अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
आग आटोक्यात आणल्यानंतर ट्रकखाली कार दबल्याचे दिसून आले. क्रेन मागवून वाहने हटवण्यात आली. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला होता. रेस्कू व्हॅनमधील कटर, स्प्रेडर व इतर साहित्याच्या मदतीने कारमधील मृतदेह काढण्यात आले. कारमधून दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलीचा मृतदेह काढण्यात आला. ट्रकमधून दोघांचे मृतदेह काढण्यात आले.
