नेमका अपघात कसा झाला?
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीच्या मते, एक कंटेनर उत्तारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. दरम्यान, या कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टैंकला आग लागली.
advertisement
हा पेटलेला कंटेनर ब्रेक फेल झाल्याने तसाच पुढे गेला. सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. कार पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या कंटेनरला जाऊन धडकली. दोन्ही अवजड कंटेनरच्या मध्ये कार अडकल्याने कारमधील लोकांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. तर कंटेनर चालक आणि क्लीनरचा देखील यात मृत्यू झाला.
कारमधील सीएनजीचा स्फोट ?
प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरने जेव्हा कारला पाठीमागून धडक दिली. तेव्हा कारमधील सीएनजी सिलिंडरचा देखील स्फोट झाला. त्यामुळे आगीने जास्त भडका घेतला. क्षणार्थात झालेल्या घटनेमुळे कारमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही. हा सगळा प्रकार अवघ्या ३०-४० सेकंदात घडला, त्यामुळे कारमधील कोणीही आपला जीव वाचवू शकले नाही, अशी माहितीदेखील प्रत्यक्षदर्शीनी दिली.
