कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
रोहित आर्याचं एन्काऊंटर झाल्यानंतर २४ तासांहून अधिक काळ रोहित आर्याच्या कुटुंबीयांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्यांच्याशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही कुटुंबीय मुंबईत आले नव्हते. मात्र अंत्यसंस्काराच्यावेळी रोहित आर्याची पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि इतर पाच नातेवाईक असे केवळ आठ जण उपस्थित होते. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि शांततेत हे अंत्यसंस्कार पार पडले.
advertisement
रोहित आर्याच्या अंत्यसंस्काराला आई वडील का नाही आले?
पण या अंत्यसंस्काराला रोहित आर्याचे आई वडील मात्र आले नाहीत. ते आपल्या मुलाला शेवटचा निरोप देऊ शकले नाहीत. पण ते अंत्यसंस्काराला का आले नाहीत? याबाबतची माहितीही आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्याचे आईवडील मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. दोघांवर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. याच कारणामुळे ते मुलाला शेवटचा निरोप द्यायला आले नसल्याची माहिती आहे. रोहित आर्याचे आई वडील पुण्यात वास्तव्याला होते. पण मात्र गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आलं आहे. त्यामुळे ते नेमके सध्या कुठे आहेत? याची माहिती मिळू शकली नाही.
नातेवाईकांनी माध्यमांशी बोलणं टाळलं
खरं तर, रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्यानंतर एक व्हिडीओ जारी केला होता. त्याने मुलांना ओलीस ठेवलं असल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. यावेळी त्याने आपल्याला सरकारमधील काही लोकांना बोलायचं आहे. सरकारने आपले २ कोटीहून अधिकची रक्कम थकवली आहे, असं त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. सरकारने पैसे थकवल्यामुळे आपण मुलांना ओलीस ठेवल्याचं त्याने म्हटलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांच्या आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे कुटुंबीय यावर काय भूमिका मांडतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र या दुर्दैवी घटनेबाबत उपस्थित नातेवाईकांनी मात्र माध्यमांशी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचं त्यांनी टाळलं.
रात्री उशिरा पुण्यात आणलं पार्थिव
रोहित आर्याने परवा दिवशी मुंबईतील पवई येथील त्याच्या स्टुडिओमध्ये मुलांना वेठीस धरलं होतं. यानंतर पोलिसांनी त्याचं एन्काऊंटर केलं होतं. या प्रकरणानंतर मुंबईतील जेजे रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर काल सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह पुण्याकडे रवाना करण्यात आला आणि मध्यरात्रीनंतर तो पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी येथे पोहोचला. पहाटे अडीचच्या सुमारास रोहित आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
