नेमके घडते काय?
पुण्यातील एका व्यावसायिकाला अशाच बनावट मेसेजचा मोठा फटका बसला असून त्याच्या खात्यातून तब्बल 2 लाख 55 हजार रुपये गायब झाले आहेत. कात्रजमधील खोपडेनगर भागात राहणाऱ्या 40 वर्षीय व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवर आरटीओ चलन असा मेसेज आला. त्यासोबत एपीके नावाची फाईलही होती. त्यांनी ती फाईल उघडली असता त्यात त्यांच्या वाहनावर 500 रुपयांचा दंड असल्याचं दिसलं. त्यानंतर लगेचच त्या मेसेजमध्ये क्लिक करा अशी सूचना आली. त्यांनी विचार न करता त्या लिंकवर क्लिक केलं. त्यानंतर त्यांना काहीही संशय आला नाही आणि ते गणेश विसर्जनासाठी बाहेर गेले.
advertisement
दुपार नंतर प्रकरण उघडं...
दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली आणि सायंकाळी चारच्या सुमारास जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 5 व्यवहार होऊन 2 लाख 55 हजार 43 रुपये काढण्यात आले होते. त्यांनी लेच बँकेत कॉल केला आणि पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही. तपास घेतल्यावर लक्षात आलं की ही संपूर्ण फसवणूक त्या बनावट एपीके फाईलमुळे झाली होती.
या घटनेनंतर व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सायबर पोलिसही तपासात सहभागी झाले आहेत. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, फसवणूक करणाऱ्यांनी व्हॉट्सअॅपवरून आरटीओच्या नावाने बनावट चलन पाठवून ही फसवणूक रचली होती. नागरिकांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारच्या फाईल्स इन्स्टॉल होताच त्या त्यांच्या बँकिंग अॅप्स आणि वैयक्तिक माहिती मिळवतात आणि पैसे चोरण्यासाठी वापरतात.
नागरिकांनी कोणती सावधिगीर बाळगावी....
पोलिसांनी सर्व नागरिकांना इशारा दिला आहे की, अशा एपीके फाईल्स किंवा अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नका. अधिकृत RTO वेबसाइट किंवा सरकारी पोर्टलवरच चलनाची माहिती तपासा. व्हॉट्सअॅपवरून येणारे आरटीओ मेसेजेस, फाईल्स किंवा लिंक्सवर विश्वास ठेऊ नका. जर अशा प्रकारचा मेसेज आला, तर तो लगेच डिलीट करा आणि सायबर हेल्पलाइन वर संपर्क साधा.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचं आणि मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही सरकारी नावाखालील मेसेजेसवर न क्लिक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अशा घटनांमुळे स्पष्ट होतं की फसवणूक करणारे आता नागरिकांना फसवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची ऑनलाइन सुरक्षा राखणं, संशयास्पद मेसेजेसकडे दुर्लक्ष करणं आणि अधिकृत वेबसाईटवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
