Pune News : अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील गणेश काळे हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. गणेश काळे हत्या प्रकरणात पहिला सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. हा सीसीटीव्ही फुटेज हाती येण्याच्या काही तासाआधीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली होती. खेड शिवापूर येथील दर्ग्यापासून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्यची माहिती आहे.या घटनेने पुण्यात खळबळ माजली आहे.
advertisement
खरं तर या गणेश काळे याची भर चौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. गणेश काळे रिक्षातून जात असताना त्यांच्यावर ४ राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी दोन गोळ्या गणेशला लागल्या. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला संपवले. काही क्षणात आरोपी घटनास्थळावरून पसार होते.दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर हा हल्ला केला होता.
पुणे पोलिसांची दहा पथके आरोपींच्या मागावर होती. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी चारही आरोपींना खेड शिवापूर इथल्या दर्ग्यापासून ताब्यात घेतले. अमन मेहबूब शेख , अरबाज अहमद पटेल आणि २ अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि इतर हत्यारे पुणे पोलिसांनी जप्त केली.
मृत गणेश काळे कोण?
मयत गणेश काळे हा गायकवाड टोळीतील नंबरकारी समीर काळे याचा भाऊ आहे. वनराज आंदेकर याला मारण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविल्याचा समीर काळे याच्यावर आरोप आहे. सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत हत्या केली होती. वनराज याच्या खुनात वापरलेली पिस्तूल समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. समीर काळे हा सध्या येरवाडा तुरुंगात आहे.
गणेश काळे हा रिक्षा चालक आहे. रिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. तो येवलेवाडी परिसरात राहायला आहे. गणेश काळे याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा देखील दाखल आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीयुद्धातून हत्या झाल्याचा निष्कर्ष काढणे हे घाईचे ठरेल. मात्र हा खून टोळीयुद्धाचा भाग आहे का, याचा तपास सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी १० पथके रवाना केली आहेत. फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण केले आहे.