सर्व्हर डाऊन झाल्याने शासकीय सेवा ठप्प
निगडी परिसरात पुरवठा विभागाची दोन कार्यालयं आहेत, त्यातील एक पिंपरी (ज) झोनमध्ये आणि दुसरं चिंचवड (अ) झोनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही झोनमधील कामकाजात तांत्रिक अडचणी येत आहेत. शुक्रवारी मात्र दोन्ही ठिकाणी सर्व्हर पूर्णपणे बंद पडला. अनेक नागरिकांनी कार्यालयात येऊन काम करण्याचा प्रयत्न केला पण सर्व्हर बंद असल्यामुळे ते शक्य झालं नाही.
advertisement
दिवाळी सुट्टी संपली, पण अधिकारी परतलेच नाहीत
त्या समस्येत आणखी भर म्हणजे शुक्रवारी दोन्ही विभागातील अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, हेच नागरिकांना कळेना. चिंचवड झोनचे अधिकारी दिवाळी सुट्टीनंतर नसल्याचे नागरिकांनी सांगितलं तर पिंपरी झोनचे अधिकारी देखील शुक्रवारी सकाळी कार्यालयात नव्हते.
पुरवठा अधिकारी प्रदीप डंगारे यांनी सांगितलं, ही तांत्रिक समस्या वरिष्ठ पातळीवरील आहे. आम्ही वारंवार सर्व्हर बंद राहण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं आहे. शुक्रवारी दुपारीपर्यंत आम्ही एफडीओच्या पुणे कार्यालयात होतो त्यानंतर निगडी कार्यालयात हजर झालो.
दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सर्व्हर नेहमी बंद असतो किंवा खूप स्लो चालतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस आमचा वेळ आणि पैसा वाया जातो. प्रशासनाने पर्यायी केंद्र सुरू करावं किंवा सर्व्हर प्रणाली मजबूत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वारंवार होणाऱ्या या तांत्रिक अडचणींमुळे रेशनसंबंधित सर्व सेवा ठप्प राहतात. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठी गैरसोय होते. नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून सेवा सुरळीत ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
