लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार याद्या मिळवण्याचं आणि सर्वेक्षणाचं काम उमेदवारांकडून करण्यात येतंय. भोर विधानसभा मतदारसंघात काहींनी निवडणूक कार्यालयाकडून मतदारांची यादी मागवली होती. या यादीत काही नावे चुकीची आहे असं दिसून आलंय. निवडणूक आयोग यावर काय कारवाई कऱणार? असा प्रश्न विचारत या गोंधळ प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जातेय. मराठी किंवा इंग्रजी नावे असतात. मात्र यादीमध्ये गुजराती नावे कशी आली? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
advertisement
मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे गावातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. काही नावे बोगस लावण्यात आली असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे आणि शिवसेना उप जिल्हाप्रमुख संतोष मोहोळ यांनी मुळशीचे तहसिलदार रणजित भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सर्व मतदार याद्या अंतिम झालेल्या आहेत. म्हाळूंगे येथीलही मतदार यादीत अनेक नावे बोगस लावण्यात आलेली आहेत. काही नावे गुजराती भाषेत आहेत तर एक मतदाराचे नाव सूर्यमुखी मंदिर आणि वडीलांचे नांव गणेश मंदिर असं दाखविण्यात आलेले आहे. यामुळे प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यामध्ये किती प्रमाणात गोंधळ आहे हे निदर्शनास येत आहे.
