मेट्रोची फिडर सेवा प्रवाशांना भावलीच नाही
महामेट्रोच्या अहवालानुसार केवळ 25 ते 30 टक्के मेट्रो प्रवासीच फिडर सेवेचा वापर करतात. म्हणजेच मेट्रोने प्रवास करणाऱ्या बहुतेक प्रवाशांनी फिडर बसचा वापर न करता स्वतःची दुचाकी, चारचाकी किंवा रिक्षा या खाजगी पर्यायांचा वापर केला आहे. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होण्याऐवजी तशीच कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
सध्या मेट्रोने दररोज सरासरी 2.25 लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांपैकी अनेकजण मेट्रो स्थानकांपर्यंत स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वापरून पोहोचतात. काही प्रवासी ऑटो रिक्षाचा वापर करतात, तर काहीजण पायी चालत स्थानकात येतात. मेट्रो प्रवाशांसाठी पीएमपीएमएलकडून अनेक भागांत फिडर बससेवा उपलब्ध करून दिली आहे, पण तिचा वापर अत्यल्प आहे.
फिडर सेवेचा वापर कमी असण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात प्रमुख म्हणजे पुणेकरांची दुचाकी वापरण्याची सवय. शहरात जवळपास प्रत्येक घरात किमान एक दुचाकी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडल्यावर लगेचच स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे अधिक सोयीस्कर वाटते. याशिवाय फिडर बसच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. अनेक वेळा बस वेळेवर उपलब्ध होत नाही, तर काही भागांमध्ये फिडर सेवेचे थेट कनेक्शन नाही. त्यामुळे प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःची वाहने वापरण्याशिवाय पर्याय राहत नाही.
तसेच फिडर बसची वारंवारता कमी, तिकीट दर स्पष्ट नसणे आणि माहितीचा अभाव ही सुद्धा मोठी अडचण आहे. काही प्रवाशांनी बसची वेळ आणि मार्गाबद्दल माहिती नसल्यामुळे गोंधळ झाल्याचे सांगितले. या सर्व कारणांमुळे मेट्रोचा मुख्य उद्देश म्हणजे रस्त्यांवरील खासगी वाहने कमी करून सार्वजनिक वाहतूक वाढवणे पण तो अद्याप पूर्णपणे साध्य झालेला नाही. मेट्रोच्या पुढील यशासाठी फिडर सेवा अधिक सक्षम, नियमित आणि प्रवाशांसाठी आकर्षक करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे
