पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२ डिसेंबर) रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी चिंचवडमधील केशवनगर परिसरात ही घटना घडली. श्रीजी सिरॅमिक या दुकानातील कामगार आशिष अरजनभा बुवा हे दुकानाची तीन लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन बाहेर पडले. ते दुकानाबाहेर थांबलेले असतानाच, चार संशयितांनी त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला आणि त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून पोबारा केला.
advertisement
पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार, रात्री चाकुने भोसकून तरुणाची निर्घृण हत्या, मित्रावरही केले वार
या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने तातडीने सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपास या त्रिसूत्रीच्या आधारे तपासचक्र फिरवले. त्यांनी थेरगाव परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले.
यश रमेश अंधारे (वय १८, रा. थेरगाव), रितेश मुकेश चव्हाण (वय १८, रा. थेरगाव), रूपेंद्र रूपबसंत बैद (वय १९, रा. पिंपरी) आणि एका विधिसंघर्षित बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहआयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक समीर लोंढे, प्रवीण तापकीर, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, गणेश मेदगे, गंगाराम चव्हाण यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली.
