नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलीतील पाटीलनगर भागात राहणाऱ्या आश्लेषा राजाराम काळे (वय ३४) या ३० नोव्हेंबर रोजी घरगुती सामानासाठी बाजारात जात होत्या. त्यांनी आपलं सोन्याचं मंगळसूत्र गळ्यात न घालता पर्समध्ये ठेवलं होतं. मात्र, वाटेत पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावरून जात असताना पर्समधून हे मंगळसूत्र निसटलं आणि रस्त्यावर पडून गहाळ झालं. घरी आल्यानंतर मंगळसूत्र पर्समध्ये नसल्याचं लक्षात येताच काळे कुटुंबीयांची मोठी धावपळ झाली.
advertisement
कामगारावर कोयत्याने हल्ला करून 4 लाखांची चोरी, पोलिसांनी थरारक लूटमारीचा काही तासांतच केला पर्दाफाश
आश्लेषा यांचे पती राजाराम काळे यांनी तत्काळ चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाला तातडीने सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे आणि त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.
सीसीटीव्ही फुटेज ठरले निर्णायक
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला रस्त्यावर पडलेली वस्तू उचलताना दिसली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्या महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला. अखेर खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आश्लेषा काळे यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचं मौल्यवान मंगळसूत्र सुपूर्द केलं. हरवलेला ऐवज सुखरूप परत मिळाल्यानं काळे कुटुंबीयांनी चिखली पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
