सिंहगड रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
केंद्र सरकारने अलीकडेच खडकवासला-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-माणिकबाग या 32 किलोमीटरच्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आहे. सिंहगड रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने 118 कोटी खर्च करून हा उड्डाण पूल काही महिन्यांपूर्वीच सुरू केला. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली. पण आता मेट्रोचे काम सुरू होत असल्याने उड्डाण पुलावर बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
advertisement
सध्या उड्डाण पुलाच्या एका बाजूची रुंदी 7.32 मीटर आहे. मेट्रोचे खांब बसवल्यानंतर ही रुंदी 6.32 मीटर इतकी राहील. म्हणजे दोन्ही बाजूंना वाहतूक मार्गिका थोडी अरुंद होणार आहे. मात्र पुलाचे बांधकाम करतानाच मेट्रोचा विचार करून जागा राखून ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
महामेट्रोने मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करतानाच महापालिकेसोबत समन्वय साधला होता. मेट्रोच्या 105५ खांबांची अलाइनमेंट निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी 39 खांबांचा पाया आधीच घेण्यात आला आहे. उर्वरित खांब उभारताना पुलाचा काही भाग कापून त्यातून खांब वर नेले जातील. हे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंना दोन-दोन वाहतूक मार्गिका उपलब्ध राहतील असे नियोजन केलेले आहे.
राजाराम पूल ते वडगाव या रस्त्यावर 30 मीटर अंतरावर एक-एक खांब उभारला जाणार असून उड्डाण पुलाच्यावर सुमारे 5.5 मीटर उंचीवर मेट्रो धावणार आहे. मात्र हे काम सुरु करण्याआधी नागरिकांनी या कामाबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे. पुण्यात यापूर्वी उड्डाण पुलांमध्ये झालेल्या चुका लक्षात घेता सिंहगड रस्त्यावरही कोणताही गैरसमज किंवा खर्च वाया जाऊ नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
