खड्ड्यांनी हैराण झालेल्या पुणेकरांना मिळणार दिलासा
शहरातील प्रत्येक रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने आता ''खड्डेमुक्त रस्ते अभियान'' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विशेष अभियान उद्यापासून सुरू होणार असून यासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके 7 ठेकेदारांमार्फत शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे भरून रस्त्यांची दुरुस्ती करणार आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
advertisement
दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 31 एप्रिल या दिवसात पथ विभागाकडून विविध सरकारी, निमशासकीय आणि खासगी संस्थांना पाइपलाइन किंवा सेवा वाहिन्या टाकण्यासाठी सशुल्क खोदकामाची परवानगी दिली जाते. यानंतर 1 मेपासून खोदकाम बंद करून 31 मेपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा ही दुरुस्ती निकृष्ट दर्जात केली जाते, त्यामुळे पावसाळ्यात रस्ते पुन्हा उखडतात आणि मोठे खड्डे पडतात. परिणामी पावसाचे पाणी साचते, वाहतूक मंदावते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली असता, रस्त्यांवरील खड्डे आणि अयोग्य दुरुस्ती याचा मुद्दा त्यांनी गांभीर्याने घेतला. त्यानंतर खड्डेमुक्त पुणे या स्वतंत्र उपक्रमाची घोषणा करण्यात आली.
या मोहिमेत प्रत्येक पथकाला 10 ते 10 किलोमीटर रस्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. दुरुस्तीचे हे काम कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी नसून, नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळावा हे यामागचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
