नेमके घडले काय?
या घटनेची तक्रार आण्णासाहेब पोपट देशमुख यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी मल्लय्या विद्यानंद हिरेमठ (रा. सोलापूर), अक्षय जगन्नाथ झेंडे (रा. हिंजवडी), अकील रज्जाक शेख (रा. पर्वती, पुणे), मंजुनाथ गिरमल्ला गौडगांव (रा. नागणसूर) आणि चंद्रकांत रवींद्र उमाळे (रा. पिंपळे निलख) या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या दरम्यान संशयितांनी हुशारीने फसवणुकीची ही साखळी रचली. त्यांनी दुकानदारांच्या नावे माल बुक करून त्यांच्या मोबाईलवर आलेले डिलिव्हरी ओटीपी स्वतःकडे घेतले आणि तो माल दुकानदारांना न देता स्वतःकडेच ठेवला. नंतर त्यांनी तो माल बाजारात विकला आणि कंपनीची जवळपास 10 लाख रुपयांची फसवणूक केली.
ही फसवणूक इतक्या हुशारीने करण्यात आली की सुरुवातीला कंपनीलाही संशय आला नाही. मात्र, स्टॉक आणि बिलिंगमध्ये विसंगती आढळल्याने अखेर व्यवस्थापनाने चौकशी सुरू केली आणि या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपी एकाच कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून ही फसवणूक केली.
सध्या हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींच्या ताब्यातून अधिक पुरावे मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
