पुणे : पुण्यातील नेहमी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी भयानक असा अपघात घडला. एका भरधाव कंटेनरने २० वाहनांना चिरडलं. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा नवले पुलावर नेमकं अपघात रोखण्यासाठी आतापर्यंत काय केले, असे प्रश्न उपस्थितीत झाले आहे. या पुलावर हा पहिलाच अपघात नाहीये, याआधीही अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. या पुलावर नेमके अपघात का होतात, याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती दिली.
advertisement
पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी भरधाव कंटेनरने जवळपास २० वाहनांना धडक दिली. या अपघातात ८ जणांना नाहक जीव गमवावा लागला. या घटनेवर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी न्यूज १८ लोकमतशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुलावर अपघाताचं कारण सांगितलं.
नवले ब्रिजवर नेहमी अपघात घडत आले आहे. हे रोखण्यासाठी प्रशासनाने वारंवार प्रयत्न केले. पोलीस प्रशासन, NHAI, PMC एकत्रित काम करत आहे. आता नवले पुलावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे. रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासन काम करणार आहे. या घटनेचा आढावा घेतला आहे. मी स्वतः आज पालिका आयुक्तांसोबत भेट दिली आहे. त्या ठिकाणी साताऱ्याकडून येणारा रस्ता आणि पुणे शहर सुरू होत असतानाच रस्ता या दोन रस्त्यांच्या उंचीमध्ये मोठ अंतर आहे. नवले पुलाकडे यायच्या रस्त्यावर उतार खूप जास्त आहे, असं मनोज पाटील यांनी सांगितलं.
'दोन रस्त्यांच्या उंचीमध्ये खूप अंतर आहे. अनेक उपाय योजना आपण याआधी केल्या आहेत. आता देखील संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून या हायवेवर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशेष टायमिंग देण्यात आला आहे, असंही मनोज पाटील यांनी सांगितलं.
नवले पुलावर आंदोलन
दरम्यान, अपघातानंतर आज स्थानिक रहिवाशांनी नवले पुलावर आंदोलन केलं. नवले पुल येथे नागरिकांनी रास्ता रोको केला. सतत अपघात होत असल्याने स्थानिकांनी तिरडी घेऊन रास्ता रोको केला. पुलावर अपघात रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करा, अशी मागणी स्थानिकांनी केली.
