काही क्षणात आनंद हरपला
मिळालेल्या माहितीनुसार, आशा गवळी (वय 52) सकाळी घरातील पिण्याचं पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या दरम्यान त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. काही वेळानं त्यांच्या कुटुंबीयांनी घरातील विविध ठिकाणी शोध घेतला असता त्यांना पाण्याच्या टाकीत बेशुद्ध अवस्थेत दिसल्या.घरच्यांना त्यांना पाण्याच्या टाकीतून काढता न आल्याने त्यांना तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानतंर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आशा गवळी यांना बाहेर काढलं. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेहाला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णायलयात पाठवण्यात आले.
advertisement
या घटनेमुळे गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांवरच मुलाचं लग्न असल्यामुळे घरात सगळी तयारी सुरू होती. पाहुण्यांचं येणं-जाणं, लग्नाच्या कामांची लगबग सुरू होती. परंतु, त्या सर्व आनंदाला अचानक विरजण लागले. ज्या आईने आयुष्यभर आपल्या मुलांच्या संसाराची स्वप्नं रंगवली, त्या आईलाच आपल्या मुलाचं लग्न पाहण्याचं भाग्य लाभलं नाही. वरमाई म्हणून नाचत, आनंदाने लग्नात सहभागी होण्याचं आशा यांचं स्वप्न अधुरंच राहिलं.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेजाऱ्यांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच या घटनेनं हादरले आहेत. काही क्षणांत घडलेला हा अपघात किती भयंकर ठरू शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. आईच्या मृत्यूने मुलाचं मन कोलमडलं असून, लग्नाचा सारा उत्साह शोकात परिवर्तित झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे मृतदेह लवकर बाहेर काढता आला, मात्र जीव वाचवता आला नाही. या घटनेचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, आशा गवळी यांच्या निधनानंतर परिसरात शोककळा पसरली असून, सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत आहेत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मुलाचं लग्न पाहण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या आईचं अकाली निधन खरंच हृदय पिळवटून टाकणारं आहे.
