गळ्यात भगवं उपरणं, कपाळावर काळा टिळा
मंदिरातून दर्शन करून आल्यावरचा विराटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. गळ्यात भगवं उपरणं, कपाळावर काळा टिळा अन् हातात हार, अशा अवस्थेत विराट व्हि़डीओमध्ये दिसतोय. इथून तो थेट मुंबईच्या एअरपोर्टवर उतरला.
सिंहचलम देवस्थानम मंदिर आहे तरी काय?
आंध्र प्रदेशातील सिंहचलम देवस्थानम मंदिर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जवळ सिंहचलम नावाच्या टेकडीवर वसलेले आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या वराह आणि नरसिंह या दोन अवतारांच्या एकत्रित रूपाला समर्पित आहे. ही देवता भक्तांचे रक्षण करणारी आणि संकट दूर करणारी मानली जाते. सिंहचलम मंदिराचे सर्वात मोठे आणि अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्तीला वर्षातील जवळजवळ संपूर्ण काळ चंदनाचा लेप लावलेला असतो.
स्थापत्यशैलीचे सुंदर मिश्रण
या मंदिराचे बांधकाम हे कलिंग, चोळ आणि गजपती या राजघराण्यांच्या स्थापत्यशैलीचे सुंदर मिश्रण दर्शवते. मंदिरावर केलेले अतिशय सुंदर कोरीव काम या राजघराण्यांच्या समृद्ध कलात्मक वारशाची साक्ष देते. मंदिराच्या भिंती आणि खांब पौराणिक कथांवर आधारित अनेक उत्कृष्ट शिल्पे आणि चित्रे दर्शवतात. या मंदिरात दरवर्षी चंदनोत्सव (चंदन यात्रा) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, ज्याला भेट देण्यासाठी लाखो भाविक दूरदूरून येत असतात.
