विजय हजारे ट्रॉफी (वनडे) मध्ये खेळण्यासाठी आपण तयार असल्याचं रोहित शर्माने निवड समितीला सांगितलं आहे. एवढंच नाही तर त्याने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठीही स्वतःला उपलब्ध करून दिलं आहे. दुसरीकडे विराट कोहली 'जास्त तयारी' करण्याच्या बाजूने नसल्याचं सांगण्यात येत आहे. कोहलीच्या या भूमिकेमुळे बीसीसीआयसमोर अडचण निर्माण झाली आहे, कारण बीसीसीआय कोणत्याच खेळाडूला सूट द्यायला तयार नाही.
advertisement
विराट अपवाद कसा?
'समस्या विजय हजारे ट्रॉफीसंबंधी आहे. कोहली खेळू इच्छित नाही. जेव्हा रोहित शर्माही खेळायला तयार असतो, तेव्हा एका खेळाडूला अपवाद कसा असू शकतो? आम्ही इतर खेळाडूंना काय सांगायचं? की तो इतरांपेक्षा वेगळा आहे', असं बीसीसीआयमधल्या सूत्राने सांगितलं आहे. बीसीसीआय, निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सातत्याने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. खरं तर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमधील खराब कामगिरीनंतर रोहित आणि विराट यांनी बीसीसीआयच्या आग्रहावरून रणजी ट्रॉफी खेळले.
रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीने खणखणीत शतक झळकावलं. सामन्यानंतरच्या प्रेझेन्टेशन सेरेमनीमध्ये विराटने, आपण कधीही अति-तयारीवर विश्वास ठेवला नाही. माझं सर्व क्रिकेट मानसिक आहे, मी शारीरिकदृष्ट्या कठोर परिश्रम करतो, जोपर्यंत माझी फिटनेस लेव्हल चांगली आहे आणि मला बॅटिंग करताना चांगलं वाटत असतं', असं विराट म्हणाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहली आणि गंभीर यांच्यातील वाढता तणाव कमी करण्यासाठी बीसीसीआयने बुधवारी निवड समिती सदस्य प्रग्यान ओझाला रायपूरला पाठवलं आहे. प्रग्यान ओझा आणि विराट कोहली यांच्यात संभाषण सुरू असल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये दोघंही गांभिर्याने चर्चा करताना दिसत आहेत.
