स्वत:चा फिटनेस सिद्ध करण्यासाठी रोहितने विजय हजारे ट्रॉफी (वनडे) आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळण्याची तयारी दर्शवली आहे, याबद्दलचा मेसेज रोहितने बीसीसीआय आणि निवड समितीला केल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. रोहित जर भारतातल्या या दोन्ही स्थानिक स्पर्धा खेळायला तयार झाला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर तो मुंबईकडून खेळताना दिसेल. भारतामध्ये सध्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा होत आहे, तर 24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरूवात होईल, या दोन्ही स्पर्धांमध्ये रोहित खेळताना दिसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित शर्माला विजय हजारे ट्रॉफी (वनडे) ही देशांतर्गत स्पर्धा खेळायला सांगितली होती, यानंतर रोहितने फक्त विजय हजारेच नाही तर आपण सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धाही खेळायला तयार असल्याचं सांगितलं.
advertisement
रोहितची रिटायरमेंट
मागच्या वर्षी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे. मात्र फिटनेस कायम राखण्यासाठी रोहितने बीसीसीआयला सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी खेळायला तयार असल्याचे कळवले आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी मी उपलब्ध आहे, असे रोहित शर्माने सांगितल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धा ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाते. तसेच लिस्ट ए प्रकारातही मोडते. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे टी-20 मधून निवृत्त घेतल्यानंतरही रोहितने ही स्पर्धा खेळण्यात तयारी दाखवल्याने स्पर्धेतील रन किंवा विकेट त्याच्या रेकॉर्डमध्ये ग्राह्य धरण्यात येतील. निवृत्तीनंतर आयपीएल स्पर्धा खेळणे किंवा एखादी लीग खेळणे ही वेगळी गोष्ट. पण निवृत्तीनंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळण्याची रोहितच्या रुपाने खेळाडूची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.
