2011 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आता एका नवीन संघाचा भाग आहेत. 2026 च्या टी20 वर्ल्डकपपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या या अनुभवी खेळाडूची नामिबियाच्या पुरुष क्रिकेट संघासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुख्य प्रशिक्षक क्रेग विल्यम्स यांच्यासोबत या भूमिकेत काम करतील.
टी 20 वर्ल्डकप 2026 ला येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरूवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी नामिबियाला पाकिस्तान, भारत, नेदरलँड्स आणि अमेरिकेसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत-नामिबिया सामना 12 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. याचा अर्थ असा की या सामन्यात गॅरी कर्स्टन भारतीय संघाचा सामना करतील.
advertisement
2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, गॅरी कर्स्टन यांनी 2007 मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांचा कार्यकाळ 2011 च्या विश्वचषकात विजयाने संपला. भारतासोबतच्या त्यांच्या कारकिर्दीनंतर, त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.2024 मध्ये त्यांनी पाकिस्तानचे प्रशिक्षकपदही सांभाळले आणि नंतर स्वतःहून राजीनामा दिला.
नामिबियाची ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर गॅरी कर्स्टन म्हणाले, "क्रिकेट नामिबियासोबत काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. संघाच्या जोश आणि आवडीने आणि त्यांनी संघात उच्च-कार्यक्षमतेच्या क्रिकेटचे वातावरण कसे निर्माण केले आहे ते पाहून मी प्रभावित झालो आहे." नामिबियाने सलग चौथ्यांदा टी20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. यापूर्वी, हा संघ 2021, 2022 आणि 2o24 मध्ये टी20 विश्वचषकाचा भाग होता.
