वर्धा: जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत असली की यश मिळवणं कठीण नाही. वर्धा येथील प्रणिता रहांगडाले या विद्यार्थिनीने आपल्या कर्तृत्वातून हेच दाखवून दिले आहे. 20 वर्षीय प्रणिताने जम्मू येथे पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी वुशू चॅम्पियनशिप स्पर्धेत तावलु खेळ प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. सध्या ती कला शाखेतील पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. अभ्यासासोबतच तिने आपला खेळाचा छंद जोपासला आणि घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
advertisement
जम्मूत झाली वुशू चॅम्पियनशिप
"जम्मूत पार पडलेल्या वुशू चॅम्पियमशिप स्पर्धेसाठी मी प्रचंड मेहनत घेतली. यासाठी मी एकटीने नाही तर सर्व प्रशिक्षकांनी मला सहकार्य केलं. स्पर्धेसाठी मेहनत करवून घेतली. मी 12 वीनंतर खेळात सहभाग घेण्यास सुरुवात केली. तेव्हा वर्धा जिल्ह्यात दुसरी वुशू चॅम्पियमशिप झाली. त्यात मी सहभागी झाले आणि त्यानंतर 2021 मध्ये पहिली इंटर कॉलेज युनिव्हर्सिटी खेळले. मी खेळ सुरूच ठेवला असला तरी मला पुढे जाण्याची आणखी संधी मिळाली नव्हती. शेवटच्या वर्षी माझं इंटर कॉलेज सिलेक्शन झालं. त्यानंतर माझी ऑल इंडियासाठी निवड झाली. जम्मू युनिव्हर्सिटीला या मॅचेस पार पडल्या. त्यात मी गोल्ड मेडल प्राप्त केले आहे."असं प्रणिता सांगते. तसेच यशाचं श्रेय तिने आईवडील आणि प्रशिक्षक अभिजित पारगावकर, अक्षय नेहारे, निलेश राऊत यांना दिले आहे.
वर्धेतील 12 खेळाडूंचे राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेत घवघवीत यश; ग्रामीण भागातील मुलींनी जिंकली पदके
पुढेही स्पर्धा जिंकणार
"भविष्यात मला नोकरी लागली तरीही मी या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आणि मेडल्स प्राप्त करणार आहे. या यशामुळे माझा आत्मविश्वास आणि इंटरेस्ट वाढला आहे. जर मला यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. तर मी नक्कीच खेळून यश मिळविण्याचा प्रयत्न करीन" असा विश्वास प्रणिताने व्यक्त केला.
तरुणांना दिला संदेश
आजकालची तरुण पिढी मोबाईल आणि व्यसनाच्या नादाला लागलेली दिसते. त्यांना अभ्यासात मन नसेल तर खेळ विश्वात नाव कमावण्याची संधी आहे. खेळ जमत नसेल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करावं किंवा एखाद्या कलेत तुम्ही हुशार असाल तर त्यात पुढे जावं. मार्शल आर्टस् या खेळात इतर प्रकारांमध्येही शिक्षण घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता, असं प्रणिता सांगते.
जम्मू येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विद्यापीठांतून स्पर्धकांचा सहभाग होता. त्यातील नागपूर विद्यापीठातून 38 खेळाडूंची निवड झाली होती. त्यापैकी चार खेळाडूंना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक प्राप्त झालंय. त्यातील एक म्हणजे प्रणिताला सुवर्णपदक प्राप्त झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.





