नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबई येथे रंगणार आहे. हा सामना ऐतिहासिक ठरणार असून, दोन्ही संघांसाठी हा पहिला वर्ल्ड कप किताब जिंकण्याचा सुवर्णसंधीचा क्षण आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि लॉरा वोल्व्हर्टच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन संघ दोघेही विजेतेपदासाठी सज्ज आहेत. भारताचा हा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचा माहोल आहे. मात्र, हवामानाच्या अंदाजामुळे थोडी चिंता वाढली आहे, कारण या सामन्यावर पावसाचे सावट घोंघावत आहे. सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चाहत्यांची टेन्शन वाढली असून, दोन्ही संघांनाही त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
फायनल रद्द झाल्यास कोण चॅम्पियन?
हा सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या ठिकाणी 2 नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता तब्बल 63 टक्के आहे. यापूर्वीही सामन्यांदरम्यान पावसाचा व्यत्यय आला होता. विशेषतः भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत थोडा पाऊस झाला होता, पण सामना पूर्ण खेळला गेला. त्यापूर्वी बांग्लादेशविरुद्ध भारताचा सामना मात्र पावसामुळे रद्द झाला होता. मात्र फायनल रद्द होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण ICC ने या सामन्यासाठी ‘रिझर्व डे’ राखीव ठेवला आहे. जर 2 नोव्हेंबर रोजी सामना पूर्ण झाला नाही, तर तो 3 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. उद्दिष्ट एकच कोणत्याही परिस्थितीत अंतिम निकाल लागलाच पाहिजे.
मॅच पूर्णच झाला नाही, तर मग काय होईल?
हा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात घर करून बसला आहे की जर दोन्ही दिवशी पाऊस झाला आणि सामना पूर्ण खेळता आला नाही, तर चॅम्पियन कोण ठरेल? भारताला ट्रॉफी मिळेल का, की दक्षिण आफ्रिका विजयी ठरेल? याचे उत्तर ICC च्या नियमानुसार स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) अशा परिस्थितीसाठी विशेष नियम आखले आहेत. उपांत्य फेरीतील सामना रद्द झाल्यास, गुणतालिकेच्या आधारे पुढील फेरीतील संघ ठरवले जातात. पण अंतिम सामन्याबाबत नियम वेगळा आहे. जर फायनल पूर्ण खेळला गेला नाही आणि परिणाम शक्य झाला नाही, तर कोणत्याही संघाला एकट्याने विजेता घोषित केले जात नाही. अशावेळी दोन्ही संघांना संयुक्त विजेते (Joint Winners) घोषित केले जाते आणि दोन्ही संघांमध्ये ट्रॉफी वाटली जाते.
म्हणजेच जर पावसाने अंतिम सामना धुवून टाकला तर भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ महिला विश्वचषक 2025 चे संयुक्त विश्वविजेते ठरतील.
