रातोरात नाहीसं झालं मंदिर, प्रकरण नेमकं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हे मंदिर ठाण्यातील ढोकाळी परिसरात आहे. या परिसरातील तब्बल 50 वर्षे जुने कुलदैवताचे मंदिर मूर्तीसह गायब झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हायलँड पार्क रोडवरील हे मंदिर परिसरातील लोकांसाठी श्रद्धेचं केंद्र होतं. पण आता मंदिरच जागेवरून हवे सारख गायब झालं आहे.
advertisement
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मंदिरासोबतच त्यातील चांदीचे पूजासामान, घंटा, आरतीचे ताट आणि अन्य मौल्यवान वस्तूही गायब झालेल्या आहेत. एवढंच नव्हे तर मंदिराशेजारी असलेली जुनी ऐतिहासिक विहिरदेखील बुजवण्यात आली आहे. संपूर्ण परिसर सपाट करून टाकण्यात आला असून मंदिर अस्तित्वाचा कुठलाही पुरावा उरलेला नाही.
नेमकं कधी घडली घटना?
२० सप्टेंबर रोजी नवरात्रीनिमित्त मंदिराची स्वच्छता करण्यासाठी काही ग्रामस्थ आले असता, त्यांना मंदिर गायब झाल्याचं लक्षात आलं. हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. त्यांनी तात्काळ इतर ग्रामस्थांना याबाबतची माहिती सुद्धा देण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात याबाबतची चर्चा सुरू झाली. लोकांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की हे मंदिर एका रात्रीत कसं नाहीसं झालं असेल.
ग्रामस्थांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा राग आणखीनच वाढला. संतप्त नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत, या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
