ब्रेकअप जिव्हारी लागला, प्रेयसीसोबतचा फोटो स्टेटसला ठेवत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका तरुणाने झाडाला गळफास लावून जीवन संपवलं आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव : जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. महाविद्यालयाच्या परिसरात एका तरुणाने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.
प्राथमिक तपासानुसार, संबंधित तरुणाने ब्रेकअप झाल्याच्या कारणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित तरुणाने आपल्या प्रेयसीसोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. यानंतर त्याने गळफास लावून जीवन संपवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. सत्तू कोळी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत सत्तू याचं मागील काही दिवसांपासून याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही दिवसांपूर्वी दोघांतील नात्यात दुरावा आला आणि दोघांचं ब्रेकअप झालं. या घटनेमुळे सत्तू गेल्या काही काळापासून तणावात होता. याच कारणातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत कारण सांगितलं नाही. घटनेचा तपास केला जातोय.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
April 27, 2025 1:46 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ब्रेकअप जिव्हारी लागला, प्रेयसीसोबतचा फोटो स्टेटसला ठेवत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल


