20 रुपयांसाठी तिघांनी व्यापाऱ्याचं केलं अपहरण, जळगावमधील विचित्र घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Jalgaon: जळगाव रेल्वेस्थानकावरून एका व्यापाऱ्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव: जळगाव रेल्वेस्थानकावरून एका व्यापाऱ्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन जणांनी व्यापाऱ्याचं जळगाव रेल्वेस्थानक परिसरातून अपहरण करत त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. आरोपींनी व्यापाऱ्याला जवळच्या एका कॉलेजच्या मागे घेऊन जात मारहाण देखील केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शाहीद मुन्ना कुरेशी असं मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री ते कर्नाटक एक्सप्रेसमधून जळगावला उतरले होते. जळगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर ते स्टेशनजवळील पान टपरीवर पान घ्यायला गेले होते. त्यावेळी दुचाकीवर तीन जण त्यांच्याजवळ आले. तू गायी कापायचा व्यवसाय करतो असे आरोप लावून तिघांनी शाहिद कुरेशी यांना मारहाण करत दुचाकीवर बळजबरी बसवलं.
advertisement
तिन्ही आरोपींनी त्यांना भुसावळ रोडवरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ घेऊन गेले. त्या ठिकाणी सुरुवातीला आरोपींनी 20 रुपयाची मागणी केली. पण व्यापाऱ्याकडे इतके पैसे नसल्याने संशयित आरोपींनी त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये घेतले. तसेच खिशातील 300 रुपये देखील बळजबरीने काढून घेतले. आरोपींनी व्यापाऱ्याकडून एकूण 2 हजार 300 रुपये घेऊन त्यांना दमदाटी करून सोडून दिले.
advertisement
ही घटना घडल्यानंतर पीडित व्यापाऱ्याने तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह त्यांच्या पथकाने तपासाची चक्रं फिरवली. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी यश रवींद्र पाटील, मनोज सोनवणे, जळगाव आणि महेंद्र पांडुरंग पाटील यांना जळगावातील वाटिका आश्रम परिसरातून अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
February 02, 2025 2:49 PM IST


