उन्हाळ्यात झाड अजिबात सुकणार नाहीत, यापद्धतीने घ्या काळजी, राहतील टवटवीत!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. उन्हाळ्यात झाडांची देखभाल म्हणजे केवळ पाणी देणेच नव्हे तर झाडांच्या एकूण आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते.
बीड : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण या काळात तापमान जास्त असल्यामुळे झाडांची पाने सुकणे, गळून पडणे किंवा झाडे कोमेजणे यासारख्या समस्या दिसून येतात. मग ती झाडे घरातील असो की नर्सरीतील, योग्य पद्धतीने देखभाल केली तर झाडे ताजीतवानी राहतात. उन्हाळ्यात झाडांची देखभाल म्हणजे केवळ पाणी देणेच नव्हे तर झाडांच्या एकूण आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. ही काळजी कशी घ्यावी? याबद्दलचं कृषी अभ्यासक युवराज जंगले यांनी माहिती दिली आहे.
झाडांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी घालावे. यावेळी जमिनीत थोडा गारवा असतो त्यामुळे पाणी मुळांपर्यंत नीट झिरपते आणि ओलावा टिकून राहतो. दुपारच्या गरम वेळेत पाणी घातल्यास ते लगेच वाष्परूपात उडून जाते आणि झाडांना त्याचा फारसा फायदा होत नाही. झाडांना पाणी घालताना थेट फवारणीचा वापर केल्यास झाडांवर साचलेली धूळही धुवून जाते, असं युवराज जंगले सांगतात.
advertisement
झाडांच्या पानांवर उन्हाळ्यात धूळ साचते ज्यामुळे झाडांचे श्वसन आणि अन्न तयार करण्याची प्रक्रिया अडथळलेली जाते. याशिवाय, धुळीमुळे झाडांवर कीटक आणि बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे झाडांच्या पानांवर हलक्या पाण्याचा मारा करून ती स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. झाडांवर वेळोवेळी पाण्याचा हलका शिंपडाकरून ही धूळ स्वच्छ करता येते, असं युवराज जंगले सांगतात.
advertisement
झाडांना केवळ पाणी देऊन उपयोग होत नाही तर त्यांना योग्य पोषणही मिळाले पाहिजे. उन्हाळ्यात सेंद्रिय खतांचा वापर केल्यास झाडांची वाढ चांगली होते आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. दर पंधरा दिवसांनी झाडांना कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा इतर नैसर्गिक खते दिल्यास ते बळकट राहतात. याशिवाय, कुंडीतील झाडांना गरजेप्रमाणे नवीन माती घालून पुनर्लावणी करावी लागते.
advertisement
झाडांची काळजी घेणे म्हणजे निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट करणे होय. उन्हाळ्यात झाडांची नीट काळजी घेतली तर ती अधिक काळ ताजीतवानी आणि सजीव राहतात. झाडे देखील आपल्याला प्राणवायू देतात, सावली देतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. त्यामुळे झाडांशी मैत्री करा आणि त्यांच्या देखभालीला आपल्या दिनचर्येचा भाग बनवा, असंही युवराज जंगले सांगतात.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
April 10, 2025 5:51 PM IST

