Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात पोलिसांकडून वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न, महिलेच्या वकिलाचा दावा, कोर्टात काय घडलं?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. कोर्टाने आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोलापूर: सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. कोर्टाने आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनिषा मुसळे-माने विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मनीषा माने हिला आज कोर्टात हजर करण्यात आले. सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटल मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिला कामावरून काढल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली होती.सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आरोपी मनीषा माने हिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करणार आहेत.
advertisement
आरोपी मनिषाच्या वकिलांकडून पोलीस तपासावर प्रश्न...
आरोपी मनिषा मानेच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. त्यांनी पोलिसांकडून जाणीवपूर्वक मनिषाला या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे म्हटले. पगार कपात केल्यानंतर मनिषाने डॉ. वळसंगकर यांना पगार पूर्ण न मिळाल्यास आत्महत्या करेल असा मेल लिहिला. हा मेल आल्यानंतर डॉ. वळसंगकर आणि त्यांच्या पत्नीने तिला हॉस्पिटलमध्ये बोलावून चर्चा केली. त्यावेळी मनिषाने माफी मागितली. डॉ. वळसंगकर हे प्रख्यात डॉक्टर होते. पगार कपात केल्याने नाराज झालेल्या कर्मचाऱ्याच्या एका मेलमुळे ते टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. या प्रकरणात आणखी काही गोष्टी असण्याची शक्यता असल्याचा दावा आरोपी महिलेच्या वकिलांनी केला. या प्रकरणतील वस्तुस्थिती वेगळी आहे. ही वस्तुस्थिती बाहेर येऊ नये यासाठी अटक करण्यात आल्याचे कोर्टात सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 20, 2025 3:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात पोलिसांकडून वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न, महिलेच्या वकिलाचा दावा, कोर्टात काय घडलं?