उन्हाळी भुईमूग आणि तीळ पिकांचे बियाणे 13 जिल्ह्यांत मोफत मिळणार, इथं करा नोंदणी?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
खाद्यतेलांच्या वाढत्या आयातीवर मर्यादा आणून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने गती दिलेल्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत राज्यातील 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमूग व तिळाचे बियाणे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुणे: खाद्यतेलांच्या वाढत्या आयातीवर मर्यादा आणून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने गती दिलेल्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत राज्यातील 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमूग व तिळाचे बियाणे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे तेलबियांचे उत्पादन वाढेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारेल आणि खाद्यतेलांसाठी परदेशावरचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत भुईमूग पिकासाठी हेक्टरी 150 किलो शेंगा (114 रुपये प्रति किलो) इतकी तर तिळासाठी हेक्टरी 2.5 किलो प्रमाणित बियाणे (197 रुपये प्रति किलो) 100 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहेत. सुधारित वाणांचा प्रसार आणि पिकाची उत्पादकता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भुईमूग बियाणांचा लाभ नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर व अकोला या नऊ जिल्ह्यांना मिळणार आहे.
advertisement
तर तिळाच्या बियाण्यांचा लाभ जळगाव, बीड, लातूर आणि बुलढाणा या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळेल. प्रति लाभार्थी किमान 0.20 हेक्टर आणि कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठीच हा लाभ लागू राहणार आहे. शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडून भुईमूग बियाणे 20 किंवा 30 किलोच्या पॅकमध्ये तर तिळाचे बियाणे 500 ग्रॅम किंवा 1 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत. पॅकिंग साईजनुसार बियाणे देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा अधिक बियाणे लागल्यास जादा रक्कम स्वतः भरावी लागणार आहे.
advertisement
योजनेसाठी शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक असून अर्जाची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरच केली जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे उन्हाळी हंगामात तेलबियांच्या उत्पादनात वाढ होऊन राज्यातील खाद्यतेलाच्या गरजांची पूर्तता करण्यास मोठी मदत होणार आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 09, 2025 6:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उन्हाळी भुईमूग आणि तीळ पिकांचे बियाणे 13 जिल्ह्यांत मोफत मिळणार, इथं करा नोंदणी?







