व्हा सामील! 800 स्टॉल्स आणि पुस्तकंच पुस्तकं! पुण्यात होतोय अनोखा महोत्सव
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुणे शहराला पुस्तकांची राजधानी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शांतता… पुणेकर वाचत आहेत या विशेष वाचन उपक्रमाला शहरभर प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला.
पुणे: पुणे शहराला पुस्तकांची राजधानी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शांतता… पुणेकर वाचत आहेत या विशेष वाचन उपक्रमाला शहरभर प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला. पुण्यातील विविध भागांतून हजारो नागरिकांनी एकाच वेळी पुस्तक वाचन करून अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची धुरा राष्ट्रीय पुस्तक न्यास व पुणे पुस्तक महोत्सव समितीने सांभाळली.
फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र येत शांततेत वाचन करून पुस्तकप्रेमाचा संदेश दिला. पुण्यात 13 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या पुणे पुस्तक महोत्सव 2025 हा उपक्रम राबविण्यात आला. महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे पदाधिकारी, तसेच शहरातील अनेक सांस्कृतिक संस्था या मोहिमेचे सहआयोजक होते.
advertisement
या वाचन उपक्रमात सर्वसामान्यांपासून मान्यवरांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला. राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभागी होत हा वाचनोत्सव अधिक विशेष बनवला. सहभागी झालेल्या वाचकांनी आपला वाचनाचा फोटो अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले असून, आतापर्यंत सुमारे 40 हजारपेक्षा अधिक वाचकांनी आपले फोटो अपलोड केले आहेत.
advertisement
याशिवाय विविध शाळा, महाविद्यालये व संस्थांकडून मिळून २८ हजारांहून अधिक छायाचित्रे प्राप्त झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले. दरवर्षी वाढत जाणाऱ्या उत्साहामुळे पुणे पुस्तक महोत्सव आता देशातील महत्त्वाचा साहित्य सोहळा बनला आहे. पहिल्या वर्षी 200 स्टॉल्सने सुरू झालेला हा महोत्सव मागील वर्षी 600 स्टॉलपर्यंत पोहोचला होता. यावर्षी तब्बल 800 स्टॉल्स उभारले जाणार असून, जवळपास 12 लाखांहून अधिक पुस्तकप्रेमी महोत्सवाला भेट देतील, असा विश्वास संयोजक पांडे यांनी व्यक्त केला.
advertisement
वाचनाची सवय वाढवणे, तरुणांना वैचारिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि ज्ञानसमृद्ध समाज तयार करणे या उद्दिष्टाने उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. शांतता… पुणेकर वाचत आहेत उपक्रमाने पुण्यात वाचन संस्कृतीची नवी चळवळ सुरू केली असून, एकत्र येऊन वाचन करण्याचा हा अनोखा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक परंपरेत नवीन पर्व घडवील, अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 09, 2025 10:28 PM IST









