"आरे, वाकोला आणि विक्रोळी उड्डाणपुलाची दुरूस्ती करावी", केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी MSRDC ला दिले महत्त्वाचे निर्देश
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण यांच्या मालकीच्या आरे, वाकोला आणि विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करावे, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी दिले.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (MSRDC) यांच्या मालकीच्या आरे, वाकोला आणि विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण (Resurfacing) करावे. संपूर्ण महामार्गावर वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे. वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांची ये- जा बंद ठेवावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी दिले.
कांदळवनाच्या जागेवर अतिक्रमण करणार्यांविरोधात कांदळवन कक्ष, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्त कठोर कारवाई करावी, असे निर्देशही गोयल यांनी दिले. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, वेगवेगळी कामे तसेच नागरी सेवा- सुविधा याबाबतची आढावा बैठक केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा स्थानिक खासदार पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली स्थित आर मध्य विभाग कार्यालयात आज (दिनांक २ नोव्हेंबर २०२५) पार पडली. त्या वेळी गोयल यांनी विविध निर्देश दिले.
advertisement
आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय, आमदार प्रकाश सुर्वे, माजी आमदार भाई गिरकर यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर) शशीकुमार मीना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक आणि संचालक अनिता पाटील यांच्यासह महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांचे संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
advertisement
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बहुतांशी रस्ते काँक्रिटिकरण कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीत सुधारणा झाली आहे. वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 10 तलावांचे पुनरुज्जीवन/ सौंदर्यीकरण प्रकल्पाचे सादरीकरण केले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार आहे. सार्वजनिक - खासगी भागीदारी (PPP) तत्वावर हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. माहुल उदंचन केंद्राच्या जागेची समस्या मार्गी लागली आहे. दहिसर नदी, पोईसर नदीच्या काठावर मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे.
advertisement
केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुढे म्हणाले की, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात पाणीपुरवठा नियमित वेळेत व योग्य दाबाने व्हावा, यासाठी जलवाहिन्यांचे निरीक्षण करावे, आवश्यक असेल तेथे डागडुजी करावी. पाण्याची उपलब्धता मुबलक राहावी, याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय मंत्री गोयल यांनी दिले. सार्वजनिक प्रसाधनगृह, सशुल्क प्रसाधनगृह या विषयांवर आजच्या बैठकीत सखोल चर्चा झाली आहे. नवीन 8 ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्याचे निश्चित झाले आहे. बोरिवली येथील भगवती रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. टप्प्याटप्प्याने हे रुग्णालय वैद्यकीय सेवेत रुजू होईल. आजच्या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) यांच्या विविध विषयांवर चर्चा झाली. संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री गोयल यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 8:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
"आरे, वाकोला आणि विक्रोळी उड्डाणपुलाची दुरूस्ती करावी", केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी MSRDC ला दिले महत्त्वाचे निर्देश


