IRCTC : प्रवासापूर्वी लक्ष द्या! आयआरसीटीसीच्या नियमात झाला मोठा बदल, प्रवाशांना लागणार फटका
Last Updated:
Big Change By IRCTC : वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसीच्या निर्णयामुळे अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे. नो मील पर्याय हटवल्याने प्रवासी नाराज झाले असून सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.
मुंबई : वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेससारख्या प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता खिशाला मोठा फटका बसणार आहे. आयआरसीटीसीने गुपचूपपणे तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केल्याचे समोर आले आहे. याअंतर्गत प्रवाशांना ''नो फूड'' किंवा ''नो मील'' असा पर्याय देण्यात येत नाही. म्हणजेच जेवण नको असतानाही आता प्रवाशांना जेवणासह तिकीट बुक करावे लागणार आहे.
प्रवासात जेवण घ्यायचं नसेल तरीही द्यावंच लागेल पैसे?
या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण आता प्रवाशांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रेल्वे जेवणासाठी 300 ते 400 रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे भरावे लागत आहेत. यापूर्वी आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुक करताना प्रवाशांना ''नो मील'' हा पर्याय निवडण्याची मुभा होती. ज्यांना प्रवासादरम्यान रेल्वेचे जेवण नको असेल ते हा पर्याय निवडून फक्त सीटचे तिकीट खरेदी करू शकत होते. मात्र आता हा पर्याय पूर्णपणे दिसत नसल्यामुळे प्रवाशांना गरज नसतानाही अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.
advertisement
प्रवाशांनी सोशल मीडियावर या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक प्रवाशांनी एक्सवर पोस्ट करत आयआरसीटीसीवर प्रवाशांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मी फक्त तीन तासांसाठी प्रवास करणार आहे, तरीही मला जेवणासह तिकीट खरेदी करावं लागलं. हा प्रवाशांच्या खिशावर दरोडा आहे,असे एका प्रवाशाने ट्वीट केले आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,नो फू हा पर्याय पूर्णपणे हटवलेला नाही, तर त्याची जागा बदलण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हा पर्याय अजूनही तिकीट बुकिंग पेजवर आहे, पण थोडं खाली स्क्रोल केल्यावर तो दिसतो. त्यामुळे अनेक प्रवाशांना तो लगेच दिसत नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 9:14 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
IRCTC : प्रवासापूर्वी लक्ष द्या! आयआरसीटीसीच्या नियमात झाला मोठा बदल, प्रवाशांना लागणार फटका


