मुंबईत गेमचेंजर प्रकल्प, दादरची वाहतूक कोंडी सुटणार, असा पूल पहिल्यांदाच होणार...
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai News: मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. दादर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खास प्लॅन असून खास पूल बांदण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईतील दादर म्हटलं की अनेक ऐतिहासिक स्थळं, परंपरा, संस्कृती आणि गर्दी आठवते. पण त्याचबरोबर अनेक दशकांपासून कायम असलेली एक मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. दादर परिसरातील रस्ते आणि उड्डाणपुलांवर नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतात. या कोंडीमध्ये ‘टिळक ब्रिज’ हा पहिल्या क्रमांकावर असतोच. मात्र आता या समस्येवर तोडगा निघणार आहे. दादर टिळक ब्रिजचे अत्याधुनिक पुनर्बांधणीचे काम सुरू असून, या ठिकाणी मुंबईतील पहिला जुळा (ट्विन) केबल पूल उभारला जात आहे.
जुळ्या केबल पुलाचे काम वेगाने सुरू
दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक उड्डाणपुलालगत सध्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या नव्या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत असून, हा मुंबईतील पहिला ‘ट्विन केबल पूल’ ठरणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महारेल (Maharail-MRIDC) या संस्थेकडून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
advertisement
पुलाची वैशिष्ट्ये
एकूण लांबी : 600 मीटर
रुंदी : 16.7 मीटर
प्रत्येकी तीन मार्गिका वाहतुकीसाठी
एकूण अंदाजित खर्च : 375 कोटी रुपये
पुलावर सेल्फी पॉइंट आणि अत्याधुनिक विद्युत रोषणाईची व्यवस्था
या जुळ्या केबल पुलाच्या बांधकामासाठी 357 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुलाच्या रचनेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 600 मीटर असून, रुंदी 16.7 मीटर इतकी असेल. पुलावर वाहतुकीसाठी प्रत्येकी तीन मार्गिका (लेन्स) असतील. त्यामुळे पूर्व-पश्चिम वाहतूक अधिक सुरळीतपणे होऊ शकेल.
advertisement
काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार
या पुलाचे बांधकाम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. पहिला टप्पा: जुन्या टिळक पुलालगत नवीन पुलाची उभारणी. दुसरा टप्पा: नवीन पूल तयार झाल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतूक नवीन पुलावर वळवली जाईल. या प्रक्रियेत प्रवाशांना किंवा स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.
कामाची प्रगती आणि लक्ष्य
सध्या या प्रकल्पाचे 34 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पूल जून 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य आहे. महारेलच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पायाभरणी आणि केबल स्ट्रक्चरची प्राथमिक कामे वेगाने सुरू आहेत.
advertisement
वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
view commentsसध्या शीव आणि प्रभादेवी उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने मुंबईत वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे टिळक पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, नवीन जुळा केबल पूल तयार झाल्यानंतर दादरमधील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच, प्रवाशांचा प्रवास वेळ वाचेल आणि परिसरातील ध्वनी व वायूप्रदूषणातही घट होईल, असा अंदाज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 11:03 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत गेमचेंजर प्रकल्प, दादरची वाहतूक कोंडी सुटणार, असा पूल पहिल्यांदाच होणार...


