दुष्काळी भागात पिकवलं ड्रॅगन फ्रुट, एकरी 10 लाखांचं उत्पन्न, कशी केली यशस्वी शेती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
सांगलीतील राजेंद्र देशमुख यांनी आपल्या भागातील पहिला ड्रॅगन फ्रुटचा यशस्वी प्रयोग केला आहे आणि प्रत्येक हंगामातून ते एकरी 8 ते 10 लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा दुष्काळी तालुक्यांपैकी एक महत्त्वाचा तालुका आहे. या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरीही सिंचन प्रकल्पांमुळे बागायत शेती पिकते. याच तालुक्यातील वांगी गावाला 3600 हेक्टर इतके सर्वाधिक क्षेत्र असून वांगीकर उत्तम शेती करतात. यापैकीच राजेंद्र देशमुख यांनी आपल्या भागातील पहिला ड्रॅगन फ्रुटचा यशस्वी प्रयोग केला आहे आणि प्रत्येक हंगामातून ते एकरी 8 ते 10 लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत. कडेगावच्या वातावरणात ड्रॅगन फ्रुट पिकवताना त्यांनी नेमका काय अभ्यास केला?, कशा पद्धतीने ते हे उत्पन्न मिळवत आहेत, याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा स्पेशल रिपोर्ट.
advertisement
राजेंद्र किसन देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते 1983 पासून द्राक्ष बागांची शेती करतात. परंतु अलीकडे निसर्गाचा लहरीपणा, कमी-जास्त पाऊस यामुळे त्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करायचे ठरवले. त्यांची वांगी येथे 12 एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी सध्या 8 एकर ऊस, 2 एकर द्राक्ष बाग आणि 2 एकर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.
advertisement
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, 2007 पासून आमच्या शिवारामध्ये पाणी आहे. परंतु त्यापूर्वी पाण्याची कमतरता होती. कमी पाण्यामध्ये येणारे पीक शोधत असताना आम्हाला ड्रॅगन फ्रुटची माहिती मिळाली. ड्रॅगन फ्रूट शेतीची सखोल माहिती घेण्यासाठी मी गुजरात येथील वलसाड या गावाला भेट दिली आणि तेथील शेतकऱ्यांकडून या पिकाचे व्यवस्थापन नेमके कसे केले जाते, याची माहिती घेत शेतीची बारकाईने पाहणी केली. यानंतर स्वतःच्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे ठरवले.
advertisement
सुरुवातीला 2014 मध्ये एक एकर क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यावेळी आमच्या भागातील ही ड्रॅगन फ्रुटची पहिली बाग होती. या परदेशी पिकाचा अनुभव नसल्याने सुरुवातीची 3 वर्ष आम्हाला फारसा फायदा झाला नाही. मी ड्रॅगन फ्रुटबद्दल माहिती मिळवणे वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतीला भेटी देणे चालूच ठेवले होते.
advertisement
कडेगाव परिसरातील वातावरणाचा, मातीचा अंदाज घेत मला ड्रॅगन फ्रुटचे नेमके गणित सुटले. या पिकाला उन्हाळा वाढेल तसे कमी पाणी लागते. तसेच 15 ते 20 दिवसांनी कीटकनाशकाची एक फवारणी लागते. कमी मजूर, कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे हे पीक आहे. आज 10 वर्षांपासून मी ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहे. यातून मला समाधानकारक उत्पन्न मिळतं, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
advertisement