एक झाड आईच्या नावाने! बघता बघता राज्यभरात 20 हजार झाडं लावली, काय आहे हा उपक्रम?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
आईच्या स्मृतीतून सुरू झालेला एक उपक्रम आज हरित क्रांतीत परिवर्तित झाला आहे. पुण्यातील दौड परिसरातील पर्यावरणप्रेमी प्रशांत मूथा यांनी एक वृक्ष आणि एक मित्र या संकल्पनेवर गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने काम करत आज एक संपूर्ण जंगल फुलवलं आहे.
पुणे: आईच्या स्मृतीतून सुरू झालेला एक उपक्रम आज हरित क्रांतीत परिवर्तित झाला आहे. पुण्यातील दौड परिसरातील पर्यावरणप्रेमी प्रशांत मूथा यांनी एक वृक्ष आणि एक मित्र या संकल्पनेवर गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने काम करत आज एक संपूर्ण जंगल फुलवलं आहे. 'आईचं झाड' या उपक्रमातून सुरू झालेली वृक्षारोपण चळवळ आज महाराष्ट्रभर विस्तारली आहे. हजारो लोक या हरित अभियानाशी जोडले गेले असून, हजारो झाडांच्या माध्यमातून निसर्गाशी नातं पुन्हा घट्ट करत आहे.
प्रशांत मूथा यांनी आपल्या आईच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक झाड लावण्याचा संकल्प केला आणि त्यातून आईचं झाड ही अनोखी संकल्पना आकाराला आली. या एका भावनिक कृतीने पुढे पर्यावरण संवर्धनाच्या मोठ्या चळवळीचं रूप धारण केलं. मूथा यांच्या 'एक वृक्ष, एक मित्र' या गटाने गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रभर हजारो लोकांपर्यंत पोहोचून वृक्षारोपणाची प्रेरणा दिली आहे. आज या उपक्रमाच्या माध्यमातून 20 हजार पेक्षा अधिक झाडे लावली गेली असून, 10 हजार पेक्षा जास्त रोपांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
advertisement
या मोहिमेचा उद्देश केवळ सावलीसाठी झाडं लावणे हा नाही, तर पक्षी, किटक, फुलपाखरे आणि लहान प्राण्यांचा अधिवास निर्माण करणे हा आहे. मूथा सांगतात, आपण निसर्गाचा एक भाग आहोत. झाडं म्हणजे केवळ हिरवळ नाही, ती संपूर्ण जीवनसाखळीला जोडणारा दुवा आहे. त्यामुळेच या उपक्रमात अशा झाडांना प्राधान्य देण्यात आलं आहे जी वर्षभर पक्ष्यांना अन्न आणि आसरा देतील. दौडजवळील आईचं बन आणि वाखारी या ठिकाणी सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे आता जैवविविधतेत मोठा बदल दिसून येत आहे.
advertisement
पूर्वी क्वचितच दिसणारे पक्षी आता या परिसरात घरं बांधू लागले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी कधीच न दिसलेला सुतार पक्षी गेल्या काही महिन्यांत या जंगलात घर करून राहू लागला आहे. ही गोष्ट मूथा आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आनंदाची आणि प्रेरणादायी ठरली आहे. या उपक्रमात आतापर्यंत 2 हजार हून अधिक स्वयंसेवक जोडले गेले आहेत. प्रत्येक वृक्षाजवळ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. जेणेकरून पक्षी आणि इतर जीवांसाठी पाण्याची सोय होईल. याशिवाय, वड, पिंपळ, कडुलिंब, ताम्हण, करंज, शिसम, काटेसावर, पांगारा यांसारख्या देशी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
advertisement
प्रशांत मूथा यांच्या हरित चळवळीने केवळ पर्यावरणच नव्हे तर समाजातही एक नवा विचार रुजवला आहे. प्रत्येक झाड म्हणजे आईसमान, तिचं संगोपन आणि जतन ही आपली जबाबदारी आहे. आज आईचं झाड ही संकल्पना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण महाराष्ट्रात हरित परिवर्तनाचं प्रतीक बनली आहे. प्रशांत मूथा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुजवलेलं हे जंगल केवळ झाडांचं नाही, तर माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं पुन्हा जिवंत करणाऱ्या भावनेचंही प्रतीक आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 12, 2025 7:55 PM IST

