पुणे महापालिकेकडून अभय योजना जाहीर, मिळकत कर थकबाकीवर 75 टक्के सूट, असा लाभ घ्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pune Municipal Corporation Abhay Scheme: पुणे महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांसाठी मोठी दिलासा देणारी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे.
पुणे: पुणे महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांसाठी मोठी दिलासा देणारी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेला येत्या शनिवारपासून (दिनांक १५ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांच्या मिळकतकराच्या थकबाकीवरील दंडाच्या रकमेवर तब्बल ७५ टक्के सवलत मिळणार आहे. यामुळे अनेक थकबाकीदारांना कमी दंड भरून मूळ थकबाकी मिटवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
योजनेचा कालावधी आणि महत्त्वाचे नियम
पुणे महापालिकेची ही विशेष अभय योजना यंदा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, ती पुढील वर्षी १५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. थकबाकीदारांना या दोन महिन्यांच्या कालावधीत लवकरात लवकर थकबाकी भरून दंडातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
महापालिका प्रशासनाने यापूर्वी अशाच प्रकारे २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांमध्ये अभय योजना राबवली होती. आता या योजनांचा लाभ घेतलेल्या थकबाकीदारांना यंदाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं पुणे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
advertisement
ऑनलाइन अर्ज करता येणार
थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना ही थकीत रक्कम आणि थकीत कर भरणा करण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. नागरिक पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने देखील त्यांच्या मिळकतकराचा थकीत कर व थकबाकीची रक्कम भरू शकतात. यामुळे नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात न जाता घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे.
advertisement
मिळकतकर विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी थकबाकीदारांना आवाहन केले आहे की, या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि दंडातील मोठी सवलत मिळवून तातडीने आपली थकबाकीची रक्कम भरून महापालिकेला सहकार्य करावे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 14, 2025 10:27 AM IST


